शाळा कशी निवडावी, मराठी की इंग्लिश माध्यम? How to select a school, Marathi or English Medium?
नमस्कार मित्रांनो!
yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या पालकांपुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करताना कोणत्या प्रकारच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा? विशेषतः मराठी माध्यम की इंग्लिश माध्यम यावर पालक प्रामुख्याने फार विचार करतात आणि गोंधळलेले दिसतात. मित्रांनो आपल्या लहानपणी सहा वर्ष पूर्ण झाली की जवळच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत जाणं आणि टप्प्याटप्प्याने पुढचं शिक्षण घेत राहणं हा एक ठरलेला सामाजिक संकेत होता. मुळात इतर माध्यमांच्या शाळांची उपलब्धता नसणे आणि सर्वांसाठी सर्वच बाबतीत सोयीस्कर मराठी शाळा यामुळे हे सर्रासपणे घडायचं. पण आता इंग्रजी शाळांची संख्या, त्यातली सीबीएससी पॅटर्न, इंटरनॅशनल स्कूल्स अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था आपल्यासमोर आहेत आणि त्यामुळेच पालक मुलांच्या काळजीने गोंधळात पडलेले दिसतात. मुलांसाठी शाळा निवडताना कोणते निकष लावावेत आणि त्यांना इंग्लिश की मराठी माध्यमातून शिकवावं याविषयीच या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
मराठी की इंग्लिश माध्यम? Marathi or English Medium?
यामध्ये दोन मूलभूत प्रश्नांचा आपण विचार केला पाहिजे की, आपल्या मुलाने काय शिकलं पाहिजे आणि आपल्या मुलाने कसे शिकला पाहिजे. आता ज्यावेळी तुम्ही असा विचार करता की आपल्या मुलाने काय काय शिकलं पाहिजे तर त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याने भाषा शिकल्या पाहिजेत, मराठी असेल, संस्कृत असेल, इंग्लिश ,हिंदी असेल जर्मन, फ्रेंच असेल किंवा आपल्या मुलाने भूगोलाचा अभ्यास केला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे, त्याला आपली भारतीय संस्कृती माहिती पाहिजे. या सोबतच जेव्हा आपण विज्ञानाचा विचार करतो, त्याला मोठमोठ्या शास्त्रज्ञांविषयी माहिती पाहिजे, त्याला रोजच्या जगण्यातले शास्त्रीय सिद्धांत त्यावर आधारित गोष्टींची माहिती पाहिजे इत्यादी इत्यादी. म्हणजे मुलाने काय शिकायचं याला कुठलीही मर्यादा नाही. अमर्याद गोष्टी त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार मुले शिकू शकतात. पण याचवेळी दुसरा महत्त्वाचा प्रश्न मुलांनी कसे शिकायचे किंवा कोणत्या माध्यमातून शिकायचे आणि या प्रश्नाचं अगदी नैसर्गिक उत्तर असं की त्या मुलाने त्याच्या मातृभाषेतच शिकायचं!
आता मातृभाषा म्हणजे कोणती भाषा तर अर्थातच त्याच्या आई-वडिलांची भाषा म्हणजेच ढोबळ मनाने त्याचे आई-वडील किंवा त्याच्या घरची मंडळी जी भाषा बोलतात त्याच भाषेतून जर का मुलाने शिक्षण घेतलं तर ते मुल फार सहजपणे नवीन गोष्टी शिकतं. मातृभाषा ही घरात त्याच्या आजूबाजूला व्यवहारात ते मुल सतत ऐकत असतं, बोलत असतं त्याच्यामुळे ती भाषा मुलाला आपली वाटते आणि त्या भाषेतून मुल लवकर शिकते. याचीच दुसरी बाजू अशी की आई वडील उच्चशिक्षित असतील, सहजपणे इंग्रजी संभाषण करत असतील तर ते एक वेळ आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात टाकण्याचा विचार करू शकतात परंतु आई-वडिलांना कुठलीही इंग्रजीची पार्श्वभूमी नसेल तर मात्र मुलाचा गोंधळ उडतो. म्हणजे शाळेत शिकवली जाणारी इंग्रजी आणि रोजच्या व्यवहारातलं मराठी यामध्ये मूल भरडलं जातं. जर मूल तेवढ्या क्षमतेचं असेल तर ते हे सगळं निभावून नेतं. पण तसं नसेल तर मात्र बऱ्याचदा कुठलीच भाषा मूल नीटपणे शिकत नाही ना मराठी ना इंग्लिश! अशा सामान्य मुलांची अक्षरशः वाट लागते. बऱ्याचदा असं जाणवतं की पालक आपली सामाजिक प्रतिष्ठा (स्टेटस) राखण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.
एखादं मूल इंग्रजी मीडियम मध्ये शिकते आहे याचाच अर्थ ते हुशार आहे असा एक सामाजिक गैरसमज सध्या झालाय. पण खरतर इंग्रजीतून शिकणं आणि मूल हुशार असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपलं मूल हुशार असेल तर ते मराठी माध्यमातून देखील निश्चितपणे आपली प्रगती करू शकते. आता तर इयत्ता पहिलीपासून त्यांना इंग्रजी शिकवलं जातं. त्याच्यामुळे इंग्रजी भाषा म्हणून त्यांना यायला हवी याच्याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. पण म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट इंग्रजी मधून शिकायला हवी हा अट्टाहास चुकीचा आहे. आपल्या मातृभाषेतून मुलांना एखाद्या गोष्टीचं लवकर आकलन होतं. म्हणूनच शक्यतोवर मुलांना त्यांच्यासाठी मराठी मध्यमाच्या शाळेचीच निवड करणे योग्य!
हेही वाचा: मराठी लेखक आणि कवी यांची नावे आणि टोपणनावे I Names and Nicknames of Marathi Writers and Poets
शाळा निवडीचे निकष l Criteria for school selection in Marathi
आर्थिक परिस्थिती
बऱ्याच सीबीएससी पॅटर्न किंवा इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये खूप जास्त फी आकारली जाते. कदाचित सुरुवातीच्या वर्षांचा विचार करून पालक पटकन निर्णय घेतात पण हे मूल जसजसं पुढे जातं तसतशी ही फी कायमच वाढत जाते आणि ती पूर्ण फी त्या मुलाच्या पूर्ण शिक्षणासाठी आपल्याला झेपणार आहे का याचा योग्य विचार पालकांनी केला पाहिजे. आपली भविष्यातील आर्थिक स्थितीचा विचार पालकांनी करणे महत्त्वाचे आहे.
शाळेतील शिक्षक
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शाळेतील शिक्षक! कोणत्याही शाळेच्या सोयीसुविधा जसे की इमारत, मैदान, वर्ग यासोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त जो शिक्षक आपल्या मुलाला शिकवणार आहे, जो त्या मुलाचं भवितव्य जास्त घडवतो त्याविषयी माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का एक निरीक्षण केलं असेल तर बऱ्याच खाजगी इंटरनॅशनल स्कूल किंवा सीबीएससी पॅटर्न शाळेच्या शिक्षकांना चांगलं वेतन दिल जात नाही त्यामुळे ते शिक्षक फार काळ शाळेत नोकरी करत नाहीत त्यामुळे सतत ते शिक्षक बदलत राहतात. नवीन नवीन शिक्षक मुलांना शिकवत राहतात. फार कमी अशा शाळा आहेत की त्यांनी अतिशय चांगले शिक्षक आपल्याकडे कायम ठेवले आहेत.
शाळेबद्दलचा अभिप्राय
ज्या शाळेत तुम्ही मुलांना घालायचा विचार करत आहात त्या शाळेमध्ये शिकलेल्या आधीच्या मुलांकडून, त्यांच्या पालकांकडून त्या शाळेविषयी नक्की माहिती घ्या. त्यांच्याकडून आपल्याला शाळेबद्दलची खरी माहिती म्हणजेच ग्राउंड रियालिटी कळते. आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक शाळा आपले चांगले मार्केटिंग करतच असते, म्हणूनच असे अभिप्राय घेणे महत्त्वाचे आहे.
घरापासूनचे शाळेचे अंतर
घरापासूनचे शाळेचे अंतर ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषता इयत्ता चौथी- पाचवी पर्यंतची मुलं म्हणजेच साधारण दहा वर्षांपर्यंतची मुलं यांना शाळेत पोहोचण्यास लागणारा वेळ हा फार कळीचा मुद्दा आहे. या मुलांसाठी शाळा घरापासून जितकी जवळ असेल तेवढं उत्तम! म्हणजे काही वेळा मोठ्या शाळेत घालण्याच्या अट्टाहासापोटी त्या मुलांना स्कूल बसमधून किंवा स्वतः पालक सोडताना एक- एक तास दीड- दीड तास प्रवास करावा लागतो. एवढा प्रवास करून ती मुले शाळेत पोहोचतात तेव्हा त्यांची बरीचशी ऊर्जा प्रवासातच खर्च होऊन जाते आणि प्रत्यक्ष शाळेतील शिक्षणात त्यांचा रस निघून जातो. या मुलांच्या प्रकृतीलादेखील एवढा प्रवास झेपत नाही आणि त्यातून आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे घरापासून शाळा जितकी जवळ असेल तेवढं चांगलं.
मुलांची सुरक्षितता
शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचा घरापासून शाळेपर्यंत प्रवास आणि त्या शाळेतील वातावरण सर्वार्थाने सुरक्षित असायला हवं. म्हणजे अगदी त्या शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा ते स्वच्छतागृहे याविषयी तुम्ही चौकशी केली पाहिजे. शहरी भागातील शाळांसाठी हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
मित्रांनो तुम्हाला यासंबंधी आणखी काही मुद्दे सुचत असतील तर नक्की कळवा!
शाळा कशी निवडावी, मराठी की इंग्लिश माध्यम? How to select a school, Marathi or English Medium?
Related
आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका