शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi

शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi
नमस्कार मंडळी! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मंडळी सध्या तुम्ही जरा कुठे वर्तमानपत्र वाचलं, टी. व्ही.  बघितला, युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघितले तरी गुंतवणूक, बचत, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या आणि अशा अनेक अर्थ विषयक शब्दांचा भडिमार आपल्यावर होत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्यासमोर ठेवत असतो, त्यांच्या योजनांची जाहिरात करत असतो आणि या सगळ्यात आपला मात्र पार गोंधळ उडतो. यात आजकाल प्रामुख्याने बोललं जातं ते शेअर मार्केट मधील गुंतवणुकीविषयी  आणि त्यासंदर्भात बऱ्याच शंका आपल्या मनात असतात. म्हणूनच शेअर मार्केटविषयक मूलभूत माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून केला आहे जेणेकरून तुमच्या मनातील शेअर मार्केट विषयीचा गोंधळ दूर होऊन तुम्ही तुमच्या गुंतवणुकीविषयी योग्य निर्णय घेऊ शकाल.

Share Market Information in Marathi

तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसे काम करते, शेअर मार्केट हा जुगार आहे की एक चांगला बिझनेस आहे, शेअर मार्केट कसे शिकायचे, शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवायचे आणि शेअर मार्केटमधून नफा कसा मिळवायचा या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

शेअर मार्केट म्हणजे काय? l What is share market in Marathi?

share-market-information-in-marathi

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशंकाने म्हणजेच निफ्टीने १९००० चा उच्चांक गाठला, आज शेअर मार्केट मध्ये पडझड अशा आशयाच्या अनेक बातम्या आपल्याला नेहमी कानावर पडतात. या गोष्टी जिथे घडतात ते म्हणजे शेअर मार्केट. जशी इतर मार्केट्स असतात जसं की भाजी मार्केट की जिथे भाजीची खरेदी विक्री होते तसेच शेअर मार्केटचा शब्दशः  अर्थ आहे  जिथे शेअरची खरेदी विक्री होते ते ठिकाण.

हेही वाचा: पॉन्झी स्कीम म्हणजे नक्की काय? आपला बचाव कसा करायचा? What is Ponzi scheme? How to protect yourself? in Marathi

शेअर म्हणजे काय? l What is Share in Marathi?

शेअर चा अर्थ आहे “भाग”, प्रत्येक मोठ्या कंपन्या ज्यांची या शेअर मार्केट मध्ये नोंद आहे (लिस्टेड आहेत) त्यांच्या भांडवलाचे ठराविक समान वाटे केलेले असतात त्या प्रत्येक वाट्याला भाग किंवा शेअर म्हणतात.  त्यांच्या मालकीचा एक भाग म्हणजे शेअर. शेअर बाजार किंवा शेअर मार्केट मध्ये आपण जेव्हा शेअर विकत घेतो तेव्हा आपण तेवढ्या भांडवलाएवढी किंमत कंपनीला देतो म्हणजेच आपण त्या कंपनीत तेवढी गुंतवणूक करतो.   म्हणजे एक प्रकारे आपण त्या छोट्याशा प्रमाणात कंपनीची मालकीच घेतो म्हणा ना! आणखी सोप्पं करण्यासाठी एक उदाहरण बघूया.

शेअर मार्केट कसे काम करते? I How Share Market works in Marathi?

समजा एक कंपनी आहे अबक. त्यांना ती आणखी वाढवायची आहे. त्यासाठी लागणारे भांडवल आहे १००० रुपये. तर ती कंपनी काय करते, त्या १००० रुपयाचे १०० समान भाग करुन ते विकायला काढते.  म्हणजे प्रत्येक भाग झाला  १० रुपयाचा हाच त्या कंपनीचा ‘भाग’ किंवा ‘शेअर’! समजा तुम्ही ५० रुपये भरून असे ५ शेअर विकत घेतलेत तर तुमची गुंतवणूक झाली ५० रुपये जे त्या कंपनीला मिळतात आणि तुम्ही त्या कंपांनीच्या  ५ शेअर्सचे मालक (भागधारक/ stock holder) बनता. सगळे १०० शेअर विकले गेले की कंपनीला लागणारं १००० रूपायच भांडवल उभं राहत आणि कंपनीला ते वापरता येतात.

जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात,

समजा एका वर्षाने अबक कंपनीच्या शेअर ची किंमत आहे १५ रुपये तेव्हा जर तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला प्रत्येक शेअर मागे  १५ – १० = ५ रूपयांचा नफा मिळेल.

जर भविष्यात कंपनीला तोटा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी होतात,

समजा एका वर्षाने अबक कंपनीच्या शेअर ची किंमत आहे ७ रुपये तेव्हा जर तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला प्रत्येक शेअर मागे    १० – ७ = ३ रूपयांचा तोटा होईल.

आता हे सगळे व्यवहार जिथे घडून येतात ते म्हणजे शेअर मार्केट किंवा शेअर बाजार. शेअर मार्केटला स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, इक्विटी मार्केट, वेल्थ मार्केट अशी देखील काही नवे आहेत. इथूनच आपण लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. जी व्यक्ती कंपनीचे शेअर्स खरेदी करते किंवा विकते त्याला गुंतवणूकदार (investor) म्हणतात.

भारतीय शेअर मार्केटचा इतिहास l History of Indian Share Market.

भारतात ही सगळी खरेदी आणि विक्री सांभाळणार्‍या दोन प्रमुख संस्था आहेत त्या म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज     (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) . BSE ची स्थापना १८७५ साली झाली तर एनएसई NSE ची स्थापना १९९२ साली झाली. SEBI म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था या सगळ्या व्यवहारांचं कायदेशीर नियमन करते  जिची स्थापना १९९२ साली झालेली आहे. जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केट मध्ये येते तेव्हा सेबी ची परवानगी घेणे बंधनकारक असते.

सेन्सेक्स आणि निफ्टी l Sensex and Nifty.

Bombay stock exchange अर्थात BSE वर listed असणार्‍या पहिल्या ३० कंपन्यांच्या शेअर ची सरासरी किंमत दाखवणारा इंडेक्स म्हणजेच Sensex आणि National stock exchange म्हणजेच NSE वर listed असणार्‍या पहिल्या ५० कंपन्यांच्या शेअर ची सरासरी किंमत दाखवणारा इंडेक्स म्हणजेच Nifty.

एनएसई आणि बीएसई मार्केट च्या ट्रेडिंग ची वेळ l NSE and BSE working timing

सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.

शनिवार- रविवार आणि इतर बँक हॉलिडेल मार्केट बंद असते.

शेअरची किंमत कशी वाढते किंवा कमी होते? l How share price changes?

शेअरची किंमत कमी जास्त होण्याची दोन मुख्य कारण आहेत-

१. कंपनीची कामगिरी (दीर्घ मुदतीत)

कंपांनीच्या कामगिरीचा  परिणाम  शेअरच्या किमतीवर दीर्घ मुदतीत होत असतो.  जर कंपनी आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असेल तर कंपनीला नफा मिळतो तेव्हा अनेक गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लागतात आणि शेअरची किंमत वाढते आणि कंपनीची कामगिरी ढासळली तर तेव्हा कंपनीला तोटा होतो, लोक त्याचे शेअर्स पटकन विकायला लागतात आणि त्यामुळे शेअरच्या किंमतीदेखील उतरतात.

२. मागणी आणि पुरवठा (कमी मुदतीत)

इतर कोणत्याही मार्केटच्या नियमाप्रमाणे शेअर बाजारातील शेअरची किंमत  मागणी आणि पुरवठा यांच्या आधारे वाढते किंवा कमी होते. जर एखाद्या कंपनीच्या स्टॉकला मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल म्हणजेच खरेदी करणार्‍यांची संख्या जास्तआणि विक्री करणार्‍यांची संख्या कमी असेल  तर त्याच्या शेअरची किंमत वाढते, त्याचप्रमाणे जेव्हा पुरवठा जास्त आणि मागणी कमी असेल म्हणजेच खरेदी करणार्‍यांची संख्या कमी आणि विक्री करणार्‍यांची संख्या जास्त असेल तेव्हा शेअरची किंमत कमी होते.

प्रत्येक कंपनीच्या शेअरची किंमत वेगवेगळी असते. आणि कंपांनीचा नफा, तोटा, मागणी, पुरवठा यावरून शेअर्समध्ये किंमतीमध्ये कायम चढ-उतार होत राहतात.

हेही वाचा: वॉरेन बफे यांचे प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? l How to invest in a Share Market

शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील  तर सर्वात आधी तुम्हाला डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडावे लागेल. Zerodha, Upstox, Angel broking, Sherekhan अशा काही ब्रोकर्सच्या मदतीने आज आपण घरबसल्या डीमॅट खाते ऑनलाइन पद्धतीने उघडू शकतो. शेअर बाजारात ब्रोकर हे स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात आणि यामुळे त्यांनाच स्टॉक खरेदी विक्री करता येतात. शेअर ब्रोकर हा तुमच्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर काही चार्जेस आकारतो, यालाच ब्रोकरेज म्हणतात.

याच ब्रोकर्सच्या मदतीने आज आपण घरबसल्या मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइट च्या सहाय्याने कोणत्याही सूचीबद्ध (listed) कंपनीचे शेअर्स ऑनलाइन पद्धतीने खरेदी-विक्री करू शकतो.

Zerodha, Upstox, Angel broking, Sherekhan  इत्यादी डिस्काउंट ब्रोकर्स तुमचे डीमॅट खाते अतिशय स्वस्तात किंवा काही वेळा अगदी मोफत उघडतात. आपल्याद्वारे खरेदी झालेले शेअर्स डिमॅट खात्यात ठेवले जातात आणि ट्रेडिंग खात्याद्वारे शेअर बाजारातील शेअर्स किंवा शेअर्सचे व्यवहार करू शकतो.

डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे l Necessary Documents to open Demat and Trading account.

खालील कागदपत्रांच्या सहाय्याने आपण घरबसल्या डीमॅट खाते ऑनलाइन पद्धतीने उघडू शकतो

ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड)

पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड)

पॅन कार्ड

बँक अकाऊंटचे प्रूफ (पासबुक ची कॉपी)

मित्रांनो भारतात अजूनही फक्त ४-५% लोकांचीच ट्रेडिंग अकाऊंट आहेत तर प्रगत देशांत ही संख्या ३०-४०% च्या आसपास आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे ट्रेडिंग साठी अजूनही खूप मोठी संधी आहे.

शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi

शेयर मार्केट मधील शेअर खरेदीविक्री अर्थात ट्रेडिंग चे प्रकार | Type of Share Market Trading

एकदा आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण शेअर ची खरेदी-विक्री म्हणजेच ट्रेडिंग करु शकतो. आपल्याला शेअर मार्केट मध्ये नफा किंवा परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) कमवायचा असेल तर साधारणपणे कमी किंमतीला शेअर खरेदी करून तो जास्त किंमतीला विकला गेला पाहिजे. कधी कधी याउलट जास्त किंमतीला शेअर खरेदी करून तो कमी किंमतीला विकला जातो आणि आपल्याला तोटाही होऊ शकतो.

ट्रेडिंग साठी खालील वेगवेगळे पर्याय आहेत. 

इंट्रा डे ट्रेडिंग | Intraday Trading

आपण एखाद्या दिवशी शेअर खरेदी करून त्याच दिवशी विकला तर त्याला इंट्रा डे ट्रेडिं म्हणतात.

  • लागणारा वेळ (होल्डिंग पिरेड) – कमी (एक दिवस)
  • अपेक्षित परतावा  (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) – कमी
  • जोखीम (रिस्क)- जास्त
स्विंग ट्रेडिंग | Swing Trading

मार्केटच्या चढ उतारचा (स्विंग) च वापर या ट्रेडिंग मध्ये करतात. कमी किंमतीला शेअर खरेदी करून तो काही दिवस किंवा आठवड्यांसाठी ठेवला जातो. त्यानंतर अपेक्षित किंमतीला तो विकला तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात.

  • लागणारा वेळ (होल्डिंग पिरेड) – मध्यम (काही दिवस ते आठवडे)
  • अपेक्षित परतावा  (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) – मध्यम
  • जोखीम (रिस्क)- कमी
पोझिशनल ट्रेडिंग  | Positional Trading

कमी किंमतीला शेअर खरेदी करून थोड्या जास्त कालावधीसाठी शेअर ठेवला (होल्ड केला) आणि त्यानंतर अपेक्षित किंमतीला तो विकला तर त्याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात. या प्रकारात हा कालावधी (होल्डिंग पिरेड) काही महिन्यांपर्यंत असू शकतो.

  • लागणारा वेळ (होल्डिंग पिरेड)- जास्त (काही महिने)
  • अपेक्षित परतावा  (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) – थोडा जास्त
  • जोखीम (रिस्क)- कमी
लाँग टर्म ट्रेडिंग किंवा इन्वेस्ट्मेंट | Long Term Trading or investment

हा सर्वात जास्त काळासाठी केला जाणारा ट्रेडिंग च प्रकार आहे. यामध्ये मोठ्या आणि सर्वांना माहीत असलेल्या, चांगली कामगिरी करणार्‍या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून ते काही वर्षांसाठी ठेवले जातात आणि मग आपल्या अपेक्षित नफ्यानुसार विकले जातात.

  • लागणारा वेळ (होल्डिंग पिरेड) – जास्त (काही वर्ष)
  • अपेक्षित परतावा  (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) – सर्वाधिक
  • जोखीम (रिस्क)- कमी

मित्रांनो या प्रकारात जोखीम कमी असल्याने नवीन गुंतवणूकदारांना बऱ्याचदा हा पर्याय सुचवला जातो. रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक अशा मोठ्या कंपन्यात केलेली गुंतवणूक लाँग टर्म मध्ये चांगला नफा देऊन जाते.

ऑप्शन ट्रेडिंग l Option Trading

याला डेरिवेटिव ट्रेडिंग असेही म्हटले जाते. हा ट्रेडिंग च एक वेगळाच प्रकार आहे ज्या मध्ये कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळात खूप जास्त नफा कमावता येतो. परंतु हा तितकाच जास्त जोखीमीचा प्रकार असल्याने खूप जास्त तोटा होण्याची शक्यताही तेवढीच जास्त असते.  योग्य अभ्यासाशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय नवीन गुंतवणूकदारांनी यामध्ये उतरुच नये हे योग्य.

मित्रांनो शेअर बाजारविषयी आपणा सर्वांनाच एक आकर्षण असते.गुंतवणुकीच एक उत्तम मार्ग म्हणून शेअर बाजाराकडे पहिले जाते. शेअर मार्केट मध्ये यशस्वी झालेल्या अनेक लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो. यात भरपूर नफा कमाविणारे राकेश झुंझूनवाला, वॉरेन बफे यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत तसेच भरपूर तोटा होऊन आपले सर्वस्व हरवलेलेही आहेत. परंतु जर शेअर मार्केटचा योग्य अभ्यास करून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन आपण त्यात गुंतवणूक सुरू केली तर आपणही एक यशस्वी गुंतवणूकदर होऊ शकतो. खाली उल्लेख केलेले काही मुद्दे नक्कीच याविषयक आपल्याला मदत करतील.

शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi

हेही वाचा: आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi

शेअर मार्केट टिप्स | Share Market Tips in Marathi
  • गुंतवणूक करण्यापूर्वी पैशाचे चांगले नियोजन करा. तुमच्याकडे असलेल्या अधिकच्या पैश्यातूनच ट्रेडिंग सुरु करा. कर्ज काढून किंवा पैसे उसने घेऊन ट्रेडिंग करणे सर्वथा चुकीचे आहे.
  • शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटशी संबंधित अनेक ब्लॉग तसेच व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हल्ली यु ट्यूब वरती यासंबंधात बरीच माहिती उपलब्ध आहे. त्यातील चांगली आणि योग्य माहिती मिळवून त्यातून खूप काही शिकता येते. पण त्यासोबतच चुकीच्या माहितीपासून सावधानता तितकीच महत्त्वाची आहे.
  • गुंतवणूक करण्यासाठी स्वतः संशोधन करणे फार महत्त्वाचे आहे. टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मिडीआ, मित्र, ब्रोकर्स यांच्या बातम्या आणि टीप्स यावर अवलंबून न राहता तुम्ही स्वतः शिका आणि आपला स्टॉक स्वतःच निवडा.
  • सुरुवातीला कमी पैसे गुंतवा. एकदा तुम्हाला मार्केटची पुरेपूर ओळख झाली की हळूहळू गुंतवणूक वाढवत न्या.
  • एकाच कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या क्षेत्रातील (उदा. बँका, वाहने, मेडिकल क्षेत्र इ.) वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर मध्ये आणि  पैसे गुंतवा म्हणजे रिस्क मर्यादित राहण्यास मदत होते. पण म्हणून एकाचवेळी खूप जास्त कंपन्यांच्या शेअर मध्ये पैसे गुंतवणे देखिल योग्य नाही कारण त्यामुळे त्या सर्व स्टॉक्स चा अभ्यास करून त्यावर लक्ष ठेवणे कठीण जाते. (साधारणपणे एकावेळी ०८ ते १५ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले जाते.)
  • आपली जोखीम (रिस्क) घेण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जोखीम  किंवा रिस्क म्हणजे जर आपण पैसे गुंतवलेल्या शेअर ची किंमत कमी झाली तर तो विकताना होणारा तोटा. हा तोटा मर्यादित असणे महत्त्वाचे.
  • काही कारणाने अचानक मार्केट पडले तर घाबरू नका आणि घाईगडबडीने शेअर्स विकू नका.
  • जास्त पैश्याच्या हव्यासासाठी आपली सिस्टीम सोडून काम करू नका.
  • मित्रांनो, शेअर मार्केट मध्ये तोच यशस्वी होतो जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. नफा झाला म्हणून हुरळून ना जाता आपल्या सिस्टीम ने काम करत राहणे आणि तोटा झाला तर घाबरून न जाता किंवा शेअर मार्केट मधली आपली सगळी गुंतवणूक काढून न घेता आपल्या चुका सुधारणे आणि पुन्हा काम करणे हाच यशस्वी गुंतवणूकदाराचा मंत्र आहे. म्हणूनच सुरुवातीला जास्त परताव्याची अपेक्षा करू न करता शांत आणि संयमित मनाने ट्रेडिंग करणे केव्हाही उत्तमच.
शेअर मार्केट वरती प्रश्नोत्तरे l FAQ on Share Market

१. शेअर बाजार म्हणजे काय?

जिथे शेअरची खरेदी विक्री होते ते ठिकाण म्हणजे शेअर मार्केट.

२. मी किती रुपयांत ट्रेडिंग सुरू करू शकतो?

ट्रेडिंग साठी पैशाचे कोणतेही बंधन नाही. परंतु सुरुवातीला कमी गुंतवणूक आणि हळूहळू ती वाढवत नेणे केव्हाही उत्तम. तुम्ही येथे अमर्याद नफा कमाऊ शकता.

३. शेअर्स विकल्यानंतर किती दिवसांनी पैसे मिळतात?

साधारणपणे दोन ते तीन दिवसात सर्व व्यवहार पूर्ण होऊन आपल्या ट्रेडिंग अकाऊंट ला पैसे जमा होतात.

४. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय लागते?

डिमॅट आणि ट्रेडिंग खाते, गुंतवणुकीसाठी थोडे पैसे असले की आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक सुरु करू शकतो.

५. शेअर मार्केटमधून पैसे कमावता येतात का?

अभ्यासपूर्ण आणि भावना नियंत्रित ठेऊन केलेली दीर्घकाळ गुंतवणूक शेअर मार्केटमधून उत्तम पैसे मिळवून देते.

तर मित्रांनो शेअर मार्केट आणि गुंतवणूकीसंदर्भातली प्राथमिक माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi या लेखातून केला आहे. लेख आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणीना नक्की शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद!

Leave a comment