बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi
नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत. मित्रहो, ‘माझी आई’ या विषयावर आपण सारेच खूप लिहितो वाचतो. बाप त्यामानने दुर्लक्षित. काही बाप असतीलही तसेच भांडखोर, आपली जबाबदारी न घेणारे पण म्हणून सर्वांनाच तसं समजणं अगदीच अयोग्य. चला तर मग या लेखात आपण बाप l Baap l बाप निबंध मराठी l baap Essay on Father in Marathi या विषयावर काही वाचूया.
“बा बा”…पहिल्यांदाच माझ्या मुलाची बोबडी हाक कानावर आली आणि आनंदाची एक लहर हृदयात उमटली. नुकतंच एक वर्ष पूर्ण झालेला माझा लेक आज पहिल्यांदाच मला काही सांगू पहात होता. त्याच्या बोबड्या बोलाच सगळ्यांनाच कोण कौतुक, मीही दिवसभर त्याच कौतुकात रमलेलो पण जशी रात्री अंथरुणाला पाठ टेकली तशी मनातल्या विचारांनी धावायला सुरुवात केली. बाबा असणं खांद्यावर घेऊन फक्त एक वर्ष झालेला मी ज्यांच्या खांद्यावर हे ओझं तीस वर्षांपूर्वी ठेवलंय त्यांच्याविषयी आज पहिल्यांदाच एका ‘बाबाच्या’ नजरेतून पाहत होतो. माझ्या जन्मापासूनची तीस वर्ष झरझर नजरेसमोरून सरकू लागली. प्रसंग तेच होते फक्त त्यांच्याकडे बघायचा दृष्टीकोन आता बदलत होता. बाबा… पप्पा… आण्णा…. दादा…. आप्पा…. संबोधन कोणतंही असो पण नातं एकच, प्रत्येक संकटात पहाडासारखा पाठीशी उभा असणारा बाप! कोण असतो हा बाप? बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi.
लोक म्हणतात बाबापेक्षा आई नऊ महिन्यांनी मोठी असते पण खरंतर ज्या क्षणी ही गोड बातमी कळते त्याचक्षणी आई सोबतच बाबा नावाचा देखील जन्म होतो. गोड बातमीचा आनंद असतोच पण त्यापेक्षा कितीतरी अधिक असते खांद्यावर येणारी जबाबदारी. जन्म घेणारं बाळ आणि त्याची आई या दोघांचीही काळजी त्याला सतावू लागते. बाळ जन्मण्या आधीच त्याच्या भविष्याची स्वप्नं पडायला लागतात. आणि एकदा का बाळ या जगात आलं की ही स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपड चालू होते, त्याचा बाप व्हायला लागतो. जबाबदारीच्या ओझ्याने सवयी बदलायला लागतात.
हेही वाचा: उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi
ऑफिस सुटल्यानंतर नाना तऱ्हेची कारणं सांगून इकडे तिकडे भटकणारे त्याचे पाय आपसूक घरी वळायला लागतात, कितीही महत्त्वाची ऑफिसमधील कामे टाकून तो घरी पळायला लागतो, तेव्हा त्याचा ‘बाप’ व्हायला लागतो! कुंभाकर्णासारखी निद्रा घेणारे त्याचे शरीर बाळाच्या अस्पष्ट हुंकाराने देखिल जागे होते, तेव्हा त्याचा ‘बाप’ व्हायला लागतो!! कुठल्याही कारणासाठी ऑफिसला सुट्टी घ्यायला कुरकुरणारा तो बाळाला एक शिंक जरी आली तरी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायला निघतो, मित्रांच्या कंपूत रमणारा तो, त्यांना थापा मारून घरीच थांबायला लागतो, तेव्हा त्याचा ‘बाप’ व्हायला लागतो. तासनतास बाळाशी खेळताना तो स्वतःच लहानगा होऊन जातो तेव्हा त्याचा ‘बाप’ व्हायला लागतो.
तसं पहाता मुलाला सगळ्यात जवळ कोणी असेल तर अर्थातच जन्मदात्री आई! निसर्गतःच ती बाळाशी जोडलेली असते. बाळाला नऊ महीने पोटात वाढवते, बाळाच्या संगोपनाची सारी जबाबदारी निभावते. पण आई मुलाचं नातं हे थेट, कोणताही आडपडदा न ठेवणारं. मोकळेपणाने सगळ्या भावभावना व्यक्त करणारं. आनंद झाला बाळाला जवळ कर, राग आला अबोला धर, त्याचं काही चुकलं तर लगेच धपाटा दे. सारं काही प्रासंगिक. मनातला प्रेमाचा पाझर लगेच या गोष्टींवर मात करतो. पण बाबाच तसं नाही. ‘बाप’ नावाचा मुखवटा घालूनच त्याला मुलाशी वागावं लागतं. आतून बाप कितीही हळवा, मृदू, प्रेमळ असुदे, पण मुखवटा कायम कठोर, शिस्तप्रिय. मुलाचं काही चुकलं तर हा मुखवटा ओरडतो, पण आतून मुलासाठी तुटतो. कधीतरी कठोरपणे शिक्षा करतो, पण एकांतात मुसमुसतो. बर्याचदा मुलाच्या किंवा मुलीच्या वाढत्या वयानुसार ही कठोरता अधिकच वाढायला लागते आणि बर्याचदा नात्यात दुरावा निर्माण करते.
बाप नक्की काय करतो? मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या आवडी-निवडी, आपले छंद यांना तिलांजली देतो. स्वतःला लहानपणी पडलेले कष्ट आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत, आपल्याला न लाभलेली सुखं मुलाला मात्र नक्की मिळावीत म्हणून तो आयुष्यभर खपतो. मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करतो. संसाराची आर्थिक गणिते जुळवता जुळवता, मुलांच्या आयुष्याची बेरीज करता करता त्याच्या आयुष्याची वजाबाकी कधी होते हे त्यालाही कळत नाही. देण्यासारखं असेल ते सारं मुलांच्या ओंजळीत ओतून आपण रिता होतो, आपलं उरलं आयुष्य मुलांच्या हाती सोपवून. यात कुणाच्या वाट्याला ‘पुंडलिक’ येतो तर कुणी ‘नटसम्राट’ होतो, ज्याचं त्याचं प्राक्तन!
खरंतर बापाचं मुलाशी असलेलं नातं हे फणसासाखं. आतून गऱ्यासारख मऊ, पण बाहेरून फणसाच्या काट्यांसारखं कठोर. लहानपणी आपल्याला हे फणसाचे काटेच अधिक दिसतात, आतले रसाळ गरे समजायला स्वतःलाच बाप व्हावं लागतं!
बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi
हेही वाचा: भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi