प्रयागराज महाकुंभमेळा २०२५ l Prayagraj Mahakumbhamela 2025 in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो यावर्षी प्रयागराज मध्ये आपल्या हिंदू धर्मीयांचा अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव साजरा केला जात आहे तो म्हणजे कुंभमेळा, आणि यावर्षीचा कुंभमेळा तर महाकुंभमेळा म्हणून ओळखला जात आहे. याच कुंभमेळ्याची पौराणिक- ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व याविषयी माहिती देणारा हा लेख.
हेही वाचा: शिवरायांची आरती l Shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi
प्रयागराज महाकुंभमेळा २०२५ l Prayagraj Mahakumbhamela 2025 in Marathi
कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी (Mythological Background of Kumbhamela)
हिंदू धर्मिय पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून जी रत्ने बाहेर पडली त्यातीलच एक म्हणजे अमृत. ते जर दैत्यांच्या हाती लागले तर दैत्य अमर होतील आणि पृथ्वीवर ते राज्य करुन सर्वनाश करतील म्हणून ते दैत्यांना मिळू नये यासाठी देवांनी अमृत असलेला कुंभ घेऊन पलायन केले आणि त्याचे असुरांपासून रक्षण केले. या झटापटीत त्या कुंभातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवरती पडले. ते ज्या ठिकाणी पडले तीच चार ठिकाणे म्हणजे जेथे कुंभमेळा भरवला जातो. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) ही ती ठिकाणे होत! म्हणून या चार ठिकाणी दर बारा वर्षांनंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व (Spiritual Importance of Kumbhamela)
कुंभमेळ्यातील परंपरे प्रमाणे मध्ये त्या त्या ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे अतिशय पवित्र कर्म म्हणून ओळखले जाते. कुंभमेळा काळातील परवणींना केलेल्या स्नानाने आत्मा शुद्धी, पाप शुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो अशी या संगमांवरती किंवा नद्यांवरती स्नान करणाऱ्या लोकांची भावना असते. खरंतर स्नान हा कुंभमेळ्याचा एक भाग झाला. परंतु कुंभमेळा म्हणजे देशाच्या विविध भागांतून आलेले विविध साधू, संत, योगी, माठाधिपती,वेगवेगळ्या प्रकारची साधना करणारे ज्ञानी आणि सामान्य जनता या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र! यातही विविधा आखडयांतील साधू महत्त्वाची भूमिका बजावत असतात. नागा साधू यामध्ये विशेष उल्लेखनीय आहेत.
हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi
कुंभमेळ्याची खगोलीय पार्श्वभूमी (Astronomical Background of Kumbhamela)
मित्रांनो खर तर आपल्या हिंदू धर्मातील सर्व सण हे आकाशातील ग्रह तार्यांच्या स्थितीवर अवलंबून आहेत. कुंभमेळाही त्याला अपवाद नाही. जेव्हा गुरू ग्रह आणि सूर्याची एक विशिष्ट स्थिती आकाशामध्ये दिसते तेव्हाच कुंभमेळा आयोजित केला जातो. सूर्य आणि गुरू ग्रह यांच्या अवकाशातील स्थानावरून कुंभमेळा ठरतो.
प्रयागराजला जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा गुरु वृषभ आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो.
हरिद्वारला जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा गुरु कुंभ आणि सूर्य मेष राशीमध्ये असतो.
उज्जैनला जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा गुरु सिंह आणि सूर्य मेष राशीमध्ये असतो. (सिंहस्थ कुंभमेळा)
नाशिकला जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा गुरु सिंह आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो. (सिंहस्थ कुंभमेळा)
गुरु ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा एक फेरी पूर्ण करण्याचा कालावधी बारा वर्षांचा आहे म्हणून, गुरुची अवकाशातली ती स्थिति दर बारा वर्षानी पुन्हा येते म्हणून दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. असे बारा कुंभमेळे झाल्यानंतर म्हणजे १४४ वर्ष गेली की एका महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा वरती उल्लेख केलेला चारही ठिकाणी म्हणजेच हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक मध्ये होत असला तरी महाकुंभमेळा हा फक्त आणि फक्त प्रयागराज मध्येच होतो.
खरंतर कुंभमेळा दर तीन वर्षांनी एकदा भरतो परंतु तो चार वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी तो पुन्हा होण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो.
सहा वर्षांनी होणारा कुंभमेळा अर्धकुंभ म्हणून ओळखला जातो. तो फक्त हरिद्वार आणि प्रयागराज मध्ये होतो.
प्रयागराज येथिल त्रिवेणी संगम (Triveni Sangam at Prayagraj)
कुंभमेळ्यामध्ये विशेष महत्त्व असलेली गोष्ट म्हणजे त्रिवेणी संगमावरील स्नान! भारतातील प्राचीन प्रमुख नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जाते. हल्लीच्या काळात गंगा आणि यमुना आपल्याला स्पष्ट दिसतात तर सरस्वती गुप्त रूपाने तेथे येते असे मानले जाते. परंतु अलिकडचे संशोधन पाहता सरस्वती नदी ही प्राचीन काळात प्रवाहित होती परंतु त्यानंतरच्या भौगोलिक घडामोडींमुळे या नदीचा प्रवाह थांबला आणि आता केवळ यमुना आणि गंगा या दोनच नद्या तिथे दिसतात.
महाकुंभमेळा २०२५ (Mahakumbhamela 2025)
यावर्षी होणारा महाकुंभमेळा हा १३ जानेवारी २०२५ ला सुरू झाला असून तो ४५ दिवस चालणार आहे आणि २६ फेब्रुवारी २०२५ ला महाशिवरात्रीच्या निमित्ताने याची सांगता होईल. तब्बल ४० कोटी भाविक या कुंभमेळ्याला भेट देतील असा अंदाज आहे.
हेही वाचा: सुखकर्ता दु:खहर्ता संपूर्ण गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta full Ganpati Aarti
प्रयागराज महाकुंभमेळा २०२५ l Prayagraj Mahakumbhamela 2025 in Marathi