क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती पाणी? How much water is Cusec and TMC in Marathi

क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती पाणी? How much water is Cusec and TMC in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, जून महिन्यातला पावसाळा नेहमीच आपल्यासोबत आनंद घेऊन येतो. लहान थोर माणसं, शेतकरी सगळेच आनंदी होतात परंतु जसा जुलै महिना येतो तसा अल्हाददायक पाऊस आपलं रौद्ररूप दाखवायला सुरुवात करतो. आणि बऱ्याचदा सततच्या मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागतात. धरणांची पाणी पातळी वाढायला लागते आणि धरणे भरायला लागतात. धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू होतो. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. मग त्या विषयीच्या बातम्यांचा पूर वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल्स वरती सुरू होतो. गेल्या २४ तासात ४०० मिलिमीटर पाऊस, एका तासात तब्बल २५० मिलिमीटर पाऊस या पाऊस सांगणार्‍या बातम्यांसोबतच आणखी दोन महत्त्वाच्या बातम्या सर्वत्र दिसायला लागतात, त्या म्हणजे कोयना धरणातून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले आणि दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू किंवा कोयना धरणातील पाणीसाठा एवढे एवढे टीएमसी किंवा या धरणात केवळ इतकेच टीएमसी पाणी शिल्लक. आता यातील क्युसेक आणि टीएमसी या पाणी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा किंवा शब्द नेमके आहेत तरी काय हे आपण या लेखक पाहणार आहोत.

हेही वाचा: पाऊस कसा मोजतात? मिमी पाऊस म्हणजे किती? How rain measures? mm rain meaning in Marathi

क्युसेक म्हणजे काय? (What is CUSEC in Marathi)

क्यूसेक हे एकक हे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते. क्यूसेक चा शब्दशः अर्थ क्युबिक फुट प्रति सेकंद म्हणजेच घनफूट प्रति सेकंद (cubic feet per second). म्हणजेच जेव्हा एका सेकंदात एक घनफुट पाणी धरणातून सोडले जाते तेव्हा पाण्याच्या प्रवाहाचा वेग एक क्यूसेक एवढा असतो. लिटरमध्ये एक क्यूसेक म्हणजे साधारणपणे 29 लिटर (28.3 लिटर) पाणी.

क्युमेक म्हणजे काय? (What is CUMEC in Marathi)

क्युमेक म्हणजे मीटर क्यूब प्रतिसेकंद म्हणजेच घनमीटर प्रति सेकंद (cubic meter per second). एक मीटर क्यूब म्हणजे साधारणपणे 1000 लिटर पाणी.

एखाद्या धरणातून किती पाणी सोडले आहे हे सांगण्यासाठी ही एकके वापरली जातात. म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की या या धरणातून एक लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, म्हणजेच त्या धरणातून प्रति सेकंद एक लाख घनफूट म्हणजेच साधारणपणे २९ लाख लिटर प्रतिसेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग केला जातोय. यावरून तुम्हाला पाण्याच्या प्रमाणाचा अंदाज येईल.

टीएमसी म्हणजे काय? (What is TMC in Marathi)

टीएमसी हे एकक धरणातील किंवा मोठ्या जलाशयातील एकूण पाणीसाठा मोजण्यासाठी वापरले जाते. साधारणपणे आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात लिटर मध्ये पाण्याचे मोजमाप करतो. म्हणजे आपल्या घरात पाचशे लिटर किंवा एक हजार लिटरची पाण्याची टाकी असते. परंतु जेव्हा धरण किंवा सरोवरातील पाणीसाठा मोजायचा असतो तेव्हा लिटर हे एकक फार कमी पडते म्हणून त्या ऐवजी टीएमसी हे एकक वापरले जाते. टीएमसी म्हणजे वन थाउजंड मिलियन क्युबिक फुट (one thousand million cubic feet) म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाणी. म्हणजेच साधारणपणे शंभर कोटी म्हणजेच एक अब्ज घनफुट पाणी. एक घनफुट म्हणजे साधारणपणे २९ लिटर असा हिशेब पकडला तर एक टीएमसी म्हणजे तब्बल २९ अब्ज लिटर पाणी. कोयना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता साधारणपणे १०५ टीएमसी आहे. म्हणजेच हे धरण तब्बल १०५ X २९ अब्ज =३०४५ अब्ज लिटर पाण्याचा साठा करते. आकडे वाचून डोळे गरगरले ना? म्हणूनच लिटर मध्ये हिशेब न मांडता आपण तो टीएमसी मध्ये मांडतो.

Leave a comment