छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची मराठेशाही l Maratheshahi After Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi

नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत.  मराठेशाही म्हटलं की आपल्यासमोर उभं ठाकणारं पाहिलं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज! त्यांचा जन्म, बालपण, लढाया, युद्धनीती, गनिमी कावा, राज्याभिषेक या सगळ्याचीच आपल्याला सखोल माहिती. महाराजांनी आपल्या अजोड पराक्रमाने, कर्तृत्वाने मराठेशाहीच्या इतिहासात आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. इतिहासाच्या त्या टप्प्यावर शिवरायांनी महाराष्ट्रात जन्म घेण वर्तमान महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या दृष्टीने किती महत्वाच होत हे आपण सगळेच जाणतो. अशा जाणत्या राजाचास्वराज्याच्या संस्थापकाचा सांगोपांग इतिहास आपल्याला माहिती असण, त्यांचे विचार, त्यांचा आदर्श स्विकारण ही प्रत्येकाची जबाबदारी किंबहुना कर्तव्यच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची मराठेशाही l Maratheshahi after Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi आपल्याला कितीशी माहित आहे? असं विचारलं तर बहुतांशी नकारात्मक उत्तरच मिळेल.

मराठेशाही चा काळ तसा उण्यापुऱ्या २०० वर्षांचा. हा सगळा इतिहास एकसंधपणे वाचायचा म्हटला तरी महाकठीण काम. छावा, राऊ, पानिपत, स्वामी अशी काही गाजलेली पुस्तके किंवा अलीकडच्या काळातील स्वराज्यरक्षक संभाजी, स्वामिनी अशा मालिका, बाजीराव, पानिपत, सरसेनापती हंबीरराव सारखे चित्रपट यांनी यातल्या इतिहासाचे काही भाग प्रकाशात आणले आणि ते लोकप्रिय देखील झाले, हेच भाग एकत्र सांधण्याचा हा संक्षिप्त प्रयत्न!

Maratheshahi after Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi
                                      छत्रपती शिवाजी महाराज

 

हेही वाचा: मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

छत्रपती संभाजी महाराज l Chhatrapati Sambhaji Maharaj

एप्रिल १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला आणि मराठेशाहीतला एक मोठा अध्याय संपला. त्यानंतर थोड्याशा गृहकलहानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. शिवाजी महाराजांसारखाच पराक्रम, जाज्वल्य देशाभिमान असलेल्या शंभू राजांना आयुष्यभर दोन आघाड्यांवर लढाव लागलं. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत उतरलेला औरंगजेब आणि तेवढेच धोकादायक अंतर्गत शत्रू! जंजीऱ्याचा सिद्दी, गोव्यातील पोर्तुगीज या सर्वांनी एकाचवेळी स्वराज्यावर आक्रमणे केली होती. त्यातच फितुरीविरुद्ध महाराजांची बरीच शक्ती खर्ची पडली. तरीदेखील या सर्वांना पुरून उरत संभाजी महाराजांनी स्वराज्याचा गाडा नऊ वर्ष जिद्दीने हाकला. याच काळात सरसेनापती हंबीरराव मोहिते भक्कमपणे महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. आणि अशाच एका फंद्फितुरीतून १६८९ मध्ये शंभूराजे मुघलांहाती सापडले ज्याची परिणीती महाराजांच्या अमानुष हत्येत झाली. ज्या स्वाभिमानाने आणि धीरोदत्तपणे शंभू राजांनी मृत्यू स्वीकारला त्याने कदाचित काळही शरमला असेल. पण राजांच्या याच हत्येने पेटून उठलेला अवघा महाराष्ट्र राजाराम महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली मुघालांवर तुटून पडला.

maratheshahi-after-chhatrapati-shivaji-maharaj-in-marathi

छत्रपती राजाराम महाराज l Chhatrapati Rajaram Maharaj

दरम्यानच्या काळात रायगड किल्ला मुघलांनी जिंकून घेतला आणि संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना मुघलांनी अटक केली. राजाराम महाराज मात्र तत्पूर्वीच रायगडावरून निसटले. त्यांना सुरक्षितपणे जिंजीला हलविण्यात आले. रिक्त झालेल्या स्वराज्याच्या गादीवर छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जिंजी हे मराठ्यांचे सत्ताकेंद्र बनले. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांच्या मदतीने राजाराम महाराजांनी मुघल विरोधी लढा सुरूच ठेवला. दुर्दैवाने आधीच नाजूक प्रकृती आणि सततची धावपळ यांनी १७०० साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला.

राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर मुघलांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या मात्र महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी मराठा सरदारांना हाताशी धरून समर्थपणे मराठा आघाडी सांभाळली. मराठ्यांच्या जोरदार आक्रमणांनी महाराष्ट्राचा राजकीय पट असा काही हलला की आधी आक्रमक असलेली मोगल सेना नंतर बचावात्मक पवित्र्यात गेली. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर सहजच दख्खन जिंकू म्हणणाऱ्या औरंगजेबने तब्बल २५ वर्षे जंग जंग पछाडूनही त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यातच १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठे व मुघल यांच्यातला लढा संपुष्टात आला.

छत्रपती शाहू महाराज l Chhatrapati Shahu Maharaj

औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. त्यातून मराठी साम्राज्यापुढे एक प्रश्न उभा ठाकला, स्वराज्याचा खरा वारस कोण? राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर खंबीरपणे मुघलांशी लढणाऱ्या महाराणी ताराबाई की वारसाहक्काने संभाजीपुत्र शाहू महाराज. याच वादातून मराठा सरदार दोन गटात विभागले गेले. मात्र यात निर्णायक भूमिका ठरली ती मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांची. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर (जो ताराबाईंना मान्य नव्हता) त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद बहाल केले, ज्यांनी कान्होजी आंग्रे सारख्या मात्तबराला शाहू महाराजांच्या बाजूने वळविले आणि ताराबाईंचा विरोध मोडून काढत शाहूंच्या पदाला स्थैर्य प्राप्त करून दिले.

प्रशासकीय व्यवस्थेची उत्तम जाण, नेतृत्वगुण, मुत्सद्दीपणा या गुणांच्या जोरावर बाळाजी विश्वनाथांनी आपले महत्वपूर्ण स्थान निर्माण केले. मराठा सरदारांमधील मतभेद संपुष्टात आणून एकदिल सैन्य उभे करणे, मंत्रिमंडळाची फेरबांधणी करून राज्याची घडी नीट बसविणे अशी महत्वाची कामे शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथांनी अंमलात आणली. बाळाजी विश्वनाथ यांचा उदय ही मराठा साम्राज्यातील एक फार महत्वाची गोष्ट होती. याच घटनेने पुढे छत्रपती पदाची सत्ता संपुष्टात येऊन पेशवे पद मराठा साम्राज्याच्या केंद्रस्थानी आलं.

हेही वाचा: शिवरायांची आरती l Shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi

थोरला बाजीराव पेशवा l Thorala Bajirao Peshava

बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या मृत्युनंतर त्यांचा तरुण, तडफदार मुलगा बाजीराव वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी १७२० साली पेशवा बनला. छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या, त्यानंतरच्या काळात प्रचंड संघर्षाने राखलेल्या स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात करण्याच काम केलं थोरल्या बाजीरावांनी. बाजीरावांना त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांची साथ देखील तेवढीच भक्कम साथ मिळाली. बाजीराव म्हटले की आपण बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकहाणीवर जाऊन थांबतो पण बाजीराव पेशव्यांनी मराठी साम्राज्यासाठी दिलेलं योगदान केवळ असामान्य आहे. रणांगणावरील बाजीरावांची हुकुमत, अफाट युद्धाकौशल्य, वेगाने हालचाल करून शत्रूला कोंडीत पकडण्याचे कसब यामुळे बाजीराव अजिंक्य होते. आजदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजीरावांना नावाजले जाते ते यामुळेच. परंतु मराठा साम्राज्याच्या दुर्दैवाने १७४० मध्ये वयाच्या केवळ चाळीसाव्या वर्षी या असामान्य सेनानीचा अचानकपणे आजारी पडून मृत्यू झाला.

Maratheshahi after Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi
                                  थोरला बाजीराव पेशवा

नानासाहेब पेशवा l Nanasaheb Peshava

त्यानंतर मराठी साम्राज्याच्या पेशवेपदी बाजीरावांचा मोठा मुलगा नानासाहेब आला. मराठी साम्राज्याचा विस्तार नानासाहेबांनी त्यांचे भाऊ रघुनाथराव आणि सदाशिवराव यांच्या मदतीने चालूच ठेवला. रघुनाथारावांनी उत्तर भारतात प्रचंड आगेकूच करत मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवला आणि अखंड भारतवर्षात मराठ्यांचा दरारा उत्पन्न केला. मल्हारराव होळकरांसारख्या सरदारांनी याच काळात आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांना खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. सन १७५२ मध्ये मुघल बादशाहाशी केलेल्या करारान्वये, दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली होती. सन १७६० मध्ये अफगाणिस्तानाचा बादशाहा अहमदशहा अब्दाली जेव्हा दिल्लीवर चाल करण्यासाठी निघाला तेव्हा केवळ दिल्ली रक्षणाचा शब्द निभावण्यासाठी नानासाहेबांनी सदाशिवराव आणि मुलगा विश्वासराव यांना उत्तरेत पाठवले.

पानिपतचे तिसरे युद्ध l Battle of Panipat

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठा आणि अफगाण फौजांची गाठ पानिपत येथे पडली आणि प्रचंड रणसंग्राम घडून आला. हेच ते ऐतिहासिक ‘पानिपतचे तिसरे युद्ध’! कडाक्याची थंडी, अनेक दिवस पोटभर अन्न नाही, अपुरी रसद अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी निकराचा लढा दिला. युध्याच्या पूर्वार्धात मराठ्यांनी केलेल्या आक्रमणामुळे अब्दालीने पाळायची तयारी देखील केली होती. मात्र अचानक विश्वासरावांना गोळी लागली, पाठोपाठ भाऊसाहेब धारातीर्थी पडले आणि सगळा खेळच पालटला. मराठे दिशाहीन झाले. आणि दोन्ही बाजूंच्या प्रचंड संहारानंतर अब्दालीने विजय मिळवला. मराठ्यांची एक पिढीच्या पिढी पानिपतवर कापली गेली. या युद्धाचे अनेक दूरगामी परिणाम मराठी साम्राज्यावर झाले. ‘पानिपत होणे’, ‘भाऊगर्दी’ ही याच युद्धाने दिलेली शब्दसंपदा.

Maratheshahi after Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi
                                         पानिपतची लढाई

माधवराव पेशवा l Madhavarao Peshava

पानिपतच्या धक्क्याने नानासाहेबांचे जून १७६१ ला पुण्यात निधन झाले आणि मराठी साम्राज्यावर चिंतेचे ढग घोंघावू लागले. आपला जेष्ठ बंधू विश्वासराव आणि वडील नानासाहेब यांच्या अचानक जाण्याने न डगमगत माधवरावांनी (नानासाहेबांचे द्वितीय पुत्र) वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पेशवाईची वस्त्रे स्वीकारली. रघुनाथरावांच्या पालकत्वाखाली माधवरावांनी अत्यंत कार्यक्षमपणे मराठी राज्याचा कारभार चालवला. पानिपत नंतर खीळखिळ्या झालेल्या मराठी साम्राज्याला पुन्हा उभारी दिली.

माधवरावांच्या कारकीर्दीतच पराक्रमी मराठा सरदार महादजी शिंदे यांनी उत्तरेत पुन्हा एकदा मराठयांच वर्चस्व प्रस्थापित केलं आणि पानिपतचे शल्य धुऊन काढलं. महादजी शिंदे, नाना फडणीस, रामशास्त्री प्रभुणे अशी कित्येक माणसे माधवरावांच्या कारकीर्दीतच तयार झाली. मात्र माधवरावांच्या बारा वर्षांच्या अविश्रांत धडपडीने त्यांचे प्रकृतीस्वास्थ बिघडले आणि त्यातच १७७२ मध्ये वयाच्या केवळ अठ्ठाविसाव्या वर्षी पुण्याजवळ थेऊर येथे त्यांचे निधन झाले. माधवरावांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. मराठेशाहीतील पेशव्यांच्या मालिकेत माधवराव पेशवे सर्वाश्रेष्ठ पेशवे म्हणून संबोधले जातात. अनेक इतिहासकारांच असं मत आहे की, पानिपतच्या युद्धाने झालेल्या मराठी साम्राज्याच्या नुकासानापेक्षा कितीतरी जास्त नुकसान हे माधवरावांच्या अकाली निधनाने झाले.

हेही वाचा: श्रीराम जय राम जय जय राम l रामाची आरती l Shriram Aarati in Marathi

काका मला वाचवा! Kaka Mala Vachava

माधवरावांच्या मृत्युनंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव वयाच्या केवळ सतराव्या वर्षी पेशवा झाला. ही बाब पेशवे पदाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या आणि अनेक वर्ष राजकारणात राहूनही त्यापासून लांब असणाऱ्या रघुनाथरावांना पचली नाही आणि त्याचीच परिणीती नारायणरावांच्या खुनात झाली. शनिवार वाड्यातील याच घटनेने पेशवाईच्या अस्ताला प्रारंभ झाला असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही.

यानंतर रघुनाथरावांनी राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. पण ही गोष्ट अनेक मंत्री-सरदारांना न रुचल्याने त्यांनी, तसेच रघुनाथरावांचा नारायणरावांच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना पेशवे पदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याजागी नारायण पुत्र सवाई माधवराव पेशवा याला वयाच्या चाळीसाव्या दिवशी पेशवा करण्यात आले. अर्थातच हे पद नाममात्र होते. खरा राज्यकारभार चालविला तो प्रामुख्याने नाना फडणीस आणि महादजी शिंदे यांनी. माधवरावांच्या मृत्युनंतर तब्बल वीस वर्षे नानांनी मराठी साम्राज्य यशस्वीपणे चालवले. परंतु सत्तेसाठीच्या राजकारणाला, टोकाच्या कट कारस्थानांना कंटाळून सवाई माधवरावांनी १७९५ मध्ये शनिवारवाड्यात आत्महत्या केली.

मराठेशाहीचा अस्त l End of Maratheshahi Era

यानंतर रघुनाथरावांचा पुत्र दुसरा बाजीराव पेशवा बनला. पेशव्यांच्या मालिकेतील हा सर्वात शेवटचा पेशवा आणि पर्यायाने मराठेशाहीतील शेवटचा सत्ताधीश! याच काळात सरदारांमधील स्वार्थ, हेवेदावे उफाळून आले. स्वतःच्या स्वार्थासाठी परकीयांची मदत घेणे मराठी साम्राज्याच्या मुळावर आले. त्यातच १७९४ साली झालेले महादजी शिंदे यांचे निधन आणि १८०० साली नाना फडणीसांचा मृत्यू याने मराठी साम्राज्यातील पराक्रम, बुद्धी आणि संयम संपला आणि मराठी साम्राज्याचा ऱ्हास सुरु झाला. अखेर इंग्रजांविरोधात बराच संघर्ष होऊन १८१८ मध्ये दुसरा बाजीराव इंग्रजांना शरण गेला, शनिवारवाड्यावर इंगाजांचा झेंडा फडकला आणि एका वैभवशाली साम्राज्याचा अस्त झाला. शिवरायांनी प्रज्वलित केलेला, अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन धगधगत ठेवलेला स्वराज्याचा यज्ञ अखंड भारतवर्षात स्वाभिमानाची चिरायू ज्योत प्रज्वलित करून शांत झाला!

 

Leave a comment