उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi
नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत.आपण या लेखात उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi बघणार आहोत.
सामान्यतः आपलं आयुष्य ऋतूंभोवती फिरतं. आपले आचार- विचार, रीती रिवाज, वैचारिक भूमिका काहीही असोत, आपण वयाने, शिक्षणाने काही असू, पोटापाण्यासाठी काहीही करत असू पण ऋतूंसोबतची सर्व मनुष्य जातीची मैत्री सारखीच. आता स्थलपरत्वे त्यात काही बदल होतात एवढंच, पण नातं तेच! अर्थात प्रत्येक गोष्टीची तुलना करण्याचा मनुष्यस्वभाव इथे मागे कसा राहील? हा ऋतू छान, तो कंटाळवाणा; तो हवाहवासा हा नकोसा हे ओघानं आलंच. कोणाला हिरवागार पावसाळा आवडतो, कोणाला हुडहुडी भरवणार हिवाळा आवडतो तर काहींना उन्हाळा आवडतो(?) म्हटलं तर प्रत्येकाचं प्रत्येक ऋतूत काही आवडीचं असतं, काही खास असतं पण त्यासोबतच काही नकोस असतं आणि ते स्वीकारावच लागतं कारण आपल्याला जे आवडतं फक्त तेच द्यायला निसर्ग म्हणजे काही आपला गुलाम नव्हे. खरं तर ऋतू हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एखादं पॅकेजच असतं! त्यात जशा अनेक हव्याहव्याशा गोष्टी असतात तशाच काही नको असलेल्या गोष्टी सुद्धा येतात. पण बिचाऱ्या उन्हाळ्याला हे नकोस असणं जास्त सहन करायला लागतं. पावसाळा-हिवाळ्याच्या मानाने उन्हाळा कायम दुर्लक्षित! my favorite season summer.
हेही वाचा: बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi
पावसाळ्यातला नयनरम्य देखावा आपल्यासमोर आधी उभा राहतो पण रुद्रावतार धारण करून गावच्या गाव भुईसपाट करणारा पाऊस नंतर लक्षात येतो. हिवाळ्यातली हवीहवीशी धुक्याची दुलई आधी आठवते पण कडाक्याच्या थंडीने घेतलेले बळी नंतर समोर येतात. उन्हाळ्यावर मात्र याबाबतीत अन्याय. उन्हाळा म्हटलं की आधी आठवतो अंग निथळवणारा उकाडा आणि प्रचंड ऊन. पाणी टंचाई, पाण्यासाठी चाललेली लोकांची वणवण, जंगलातील वणवे हेही आलेच. शाळेतल्या निबंधात ‘माझा आवडता ऋतू- उन्हाळ’ my favorite season summer असं देखील त्याच्या वाट्याला येत असेल असं नाही वाटत. पण खरंच उन्हाळा इतका नकोसा असतो?
दिनदर्शिकेत जानेवारी संपून फेब्रुवारी आला की उन्हाळा सुरु होतो. पण होळीत थंडी जळाली की खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची चाहूल लागते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही चाहूल आणखी गडद होते. एकीकडे रणरणता उन्हाळा सुरु होतो तर दुसरीकडे वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गातील नवचैतन्य बहरून येते. नवी पालवी नवी उमेद घेऊन येते.
उन्हाळा म्हणजे शाळेला सुट्टी आणि मामाशी गट्टी हे समीकरण तर पक्कच! शाळांना सुट्टी पडली की मामाच्या ( मामाच शहरात असेल तर मात्र स्वतःच्याच!) गावाला जायची तयारी सुरु होते. एकदा तुम्ही गावी आलात आणि त्यातही हे गाव कोकणात असेल तर उन्हाळा म्हणजे धमाल! पहिली गोष्ट म्हणजे शहरातल्या उकाड्यातून सुटका होते आणि जरा मोकळं वाटू लागतं. एक एक कोकणी मेवा समोर येतो आणि आयुष्य हे फक्त खाण्यासाठी आहे असं म्हणत आपण त्याच्यावर तुटून पडतो. प्रत्येक गोष्टीचा पोटभर आस्वाद घेत आपली जिव्हा तृप्त होते.
खाण्याच्या तऱ्हा तरी किती? कधी हापूस आंबा व्यवस्थित सुरीने कापून खायचा तर कधी दोन-चार रायवळ आंब्यांचा रस चोखून रीचवायचा. पायरी, तोतापुरी, भोपळी असे तऱ्हेतऱ्हेचे आंबे अधूनमधून आहेतच. बरक्या फणसाचा घमघमाट सुटला की घरातील लहान थोरांनी फणसाभोवती जमायचे आणि काही वेळातच त्याचा फडशा पाडायचा. काप्या फणसाचं मात्र तसं नाही, त्याचे गरे काढणे हे कसबी काम. ते आई किंवा आज्जीने करायचं आणि आपण फक्त गरे गट्ट करायचे. कंटाळा आला की रानात हुंदडायला बाहेर पडायचं. ‘रान पिकणं’ म्हणजे काय हे अनुभवायचा ऋतू म्हणजे उन्हाळा! टपोरी आंबटगोड करवंद, जांभळं, काजू, अळू खात खात मनसोक्त फिरायचं. दुपारी नदीवर जाऊन तासन तास डुंबणे हा तर रोजचाच कार्यक्रम. पोहण्याची मजा अनुभवायला उन्हाळ्यासारखा ऋतू नाही. दमून भागून घरी आलो की जेवणावर आडवा हात मारायचा. आमरस पुरी, कैरीची चटणी, फणसाची भाजी, सोलकढी आणि असं बरच काही ही या उन्हाळ्याचीच खासियत.
लग्नसराई हा उन्हाळ्यातला सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे लग्न वर्षभरात केव्हाही होत असली तरी गावातील लग्न शक्यतो उन्हाळ्यातच. मग यजमानांची धावपळ, बायकांचं मिरवणं आणि छोट्यांची धमाल आलीच. लाऊड स्पिकरवरची दिवसभर चालू असणारी गाणी, नवरा नवरीची मिरवणूक, जेवणाच्या पंगती हा सगळा माहोल आणि उन्हाळा हे अतूट नातं आहे. उन्हाळ्याची आणखी एक खासियत म्हणजे साठवणुकीचे पदार्थ तयार करण्यासाठी महिलांची चाललेली लगबग. समस्त महिला वर्ग पापड, फेण्या, कुरडया, तऱ्हेतऱ्हेची लोणची करण्यात बुडून जातात. कोकमं, आंब्या-फणसाची साठं, कैरी पन्ह, तळलेले गरे यांच्या बरण्यांनी कपाटं भरायला लागतात. हे सगळं करताना एक नजर मात्र येणाऱ्या पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूूंची बेगमी करण्यावर असते. शेतकऱ्यांची शेतीची पूर्वतयारी सुरू होते आणि हळूहळू पावसाळ्याचे वेध लागतात.
वातावरणातला उष्मा दिवसेंदिवस वाढत जातो. उन्हाच्या झळा लागलेले पशु पक्षी पावसाच्या आगमनाकडे टक लावून बसतात. सूर्याच्या दाहक किरणांनी तप्त झालेली धरा पावसाच्या मिलनासाठी आतुर होते. उन्हाळा मावळतीकडे झुकू लागतो, ऋतुचक्र पूर्ण झालं की पुन्हा येण्यासाठी!
उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi
हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi