इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमकं काय l What is Industry 4.0 in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपलं रोजचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मानवी आयुष्यात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या त्यापैकीच एक म्हणजे उद्योग जगतामध्ये झालेली क्रांती. अगदी अश्मयुगीन काळातील दगडी अवजारांपासून तयार केल्या जाणार्या वस्तू ते आताच्या काळातील ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार होणाऱ्या वस्तू एवढी औद्योगिक प्रगतीची मोठी झेप आपण अनुभवलेय आणि ही प्रगती सातत्याने सुरूच आहे. परंतु यातही काही विशिष्ट गोष्टींच्या शोधामुळे औद्योगिक जगात जी मोठी क्रांती घडून आली अशाच प्रमुख टप्प्यांना औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रियल रेवोल्युशन (Industrial Revolution) असं म्हणतात. अशाच काही प्रमुख टप्प्यांचं नामकरण इंडस्ट्री 1.0 (Industry 1.0), इंडस्ट्री 2.0 (Industry 2.0), इंडस्ट्री 3.0 (Industry 3.0) आणि इंडस्ट्री 4.0 (Industry 4.0) असं केलं गेलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे तेच आपण या लेखात पाहणार आहोत.
हेही वाचा: मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi
औद्योगिक क्रांती-इंडस्ट्रियल रेवोल्युशन (Industrial Revolution)
एखादी वस्तू किंवा प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि त्या प्रॉडक्टची क्वालिटी किंवा दर्जा हे दोन मुद्दे औद्योगिक जगतासाठी फार महत्त्वाचे असतात. जेवढा दर्जा चांगला आणि ती वस्तू बनवण्यासाठी लागणारा वेळ कमी तेवढा औद्योगिक जगात जास्त फायदा! किंवा जेवढा वेग जास्त तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या वस्तू बनवता येऊ शकतात त्यामुळे त्यांच्या किमती कमी होतात आणि साऱ्या समाजालाच त्याचा मोठा फायदा होतो. मनुष्याच्या याच प्रयत्नातून काही महत्त्वाचे शोध लागले आणि त्यांनी उद्योग जगतावर एवढा मोठा परिणाम केला की संपूर्ण औद्योगिक जगतात क्रांती घडून आली. अशाच काही महत्त्वाच्या टप्प्यांची ही ओळख!
इंडस्ट्री 1.0 (Industry 1.0) १७८०-९० चा काळ
औद्योगिक क्रांतीमधला हा पहिला महत्त्वाचा टप्पा. औद्योगिक जगताला क्रांतीची किंवा मोठ्या बदलांची ओळख करून देणारी क्रांती म्हणजेच इंडस्ट्री 1.0 मित्रांनो प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स वॉट यांनी लावलेल्या वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे स्वयंचलित यंत्रे-ऑटोमॅटिक मशीन्स तयार होऊ लागल्या ज्यामुळे पहिल्यांदाच केवळ हातांनी बनवल्या जाणाऱ्या वस्तू मशीनच्या किंवा यंत्रांच्या माध्यमातून बनू लागल्या आणि पहिल्या औद्योगिक क्रांतीची बीजे रोवली गेली. वाफेच्या इंजिनामुळे वाहतुकीची साधने आणि उत्पादन करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झालं आणि यामुळे ही औद्योगिक क्रांती घडून आली. लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडले. लोकांना रोजगार मिळू लागला आणि त्यामुळेच जनमानसात थोडी सुखाची भावना निर्माण झाली. वाफेच्या इंजिनामुळे प्रामुख्याने टेक्स्टाईल इंडस्ट्री किंवा यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला.
इंडस्ट्री 2.0 (Industry 2.0) १८७०-८० चा काळ
औद्योगिक क्रांती मधील दुसरे महत्त्वाचे पर्व म्हणजे इंडस्ट्री 2.0. उत्पादनाचा वाढता वेग हे या औद्योगिक क्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य! यंत्रामुळे ज्या वस्तू तयार करणे शक्य झाल्या होत्या त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन- मास प्रोडक्शन (mass production) या क्रांतीमुळे शक्य झालं आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर फार मोठा प्रभाव पडला. असेंबली लाईन (Assembly Line) किंवा म्हणजे एका क्रमाने उत्पादन या संकल्पनेमुळे मोठ्या प्रमाणावर आणि खूप कमी वेळात एकाच प्रकारच्या गोष्टीचे उत्पादन घेणं शक्य झालं. असेंबली लाईन (Assembly Line) म्हणजेच एकच प्रॉडक्ट किंवा वस्तू पुढच्या पुढच्या टप्प्यांमध्ये एकापाठोपाठ एक पाठवली जाते आणि वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी काम केली जातात. यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो. इंडस्ट्री 2.0 साठी कारणीभूत असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्युत निर्मिती. या काळातील विजेच्या उपलब्धतेमुळे यंत्र (Machines) आणि वाहतूक- ट्रान्सपोर्टेशन (Transportation) यांच्या उत्पादकतेमध्ये किंवा एफिशियन्सीमध्ये (Efficiency) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे एकाच वस्तूच्या मोठ्या उत्पादनामुळे त्या वस्तूची किंमत कमी झाली आणि त्याचा फायदा सगळ्यात जगाला व्हायला लागला. याच औद्योगिक क्रांतीमध्ये पुढील काळात होऊ घातलेल्या ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन (Automation and Digitalization) या गोष्टींची बिजं रोवली गेली होती. टेलिफोनचा शोध, लाईट बल्ब आणि वाहतुकीच्या साधनांमधील प्रगती हे याच काळातील काही लक्षणीय शोध होते.
इंडस्ट्री 3.0 (Industry 3.0) १९७०-८० चा काळ
डिजिटल रिव्होल्यूशन (Digital Revolution) आणि त्यामुळे झालेलं मोठ्या प्रमाणावरील ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन (Automation and Digitalization) ही या क्रांतीची मुख्य वैशिष्ठ्ये. याच काळात संगणकाचा – कॉम्प्युटरचा (Computer) शोध लागला आणि कॉम्प्युटरने पाहता पाहता माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत प्रवेश केला. हाच कॉम्प्युटर औद्योगिक क्षेत्रात आल्यानंतर सगळ्या गोष्टींचे संगणकीकरण आणि ऑटोमेशन (Computerization and Automation) झाले. यामुळे मनुष्यबळाची मागणी कमी झाली आणि जास्त ॲक्युरसी किंवा अचूकतेने कामे करता येऊ लागली. त्यामुळे वस्तूंच्या उत्पादनाच्या वेगात आणि त्यांच्या अचुकतेमध्ये मोठी वाढ झाली. इंटरनेटच्या (Internet) उपलब्धतेमुळे आणि परिणामकारक वापरामुळे जागतिकीकरण-ग्लोबलायझेशन (Globalization) या संकल्पनेला या औद्योगिक क्रांतीने चालना दिली. ऑटोमॅटिक सीएनसी मशीन (CNC Machines), किंवा विविध कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स (Computer Software) ही काही लक्षणीय उदाहरणे
इंडस्ट्री 4.0 (Industry 4.0) २०१५-२० चा काळ
एकूणच इंडस्ट्री 4.0, इंडस्ट्रियल रेवोल्युशन किंवा औद्योगिक क्रांतीची ही जी चर्चा आपण करतो आहेत याचं मूळ आहे सध्याच्या जगात आलेली औद्योगिक क्रांती चौथी किंवा इंडस्ट्री 4.0! आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए आय (Artificial Intelligence- AI), मशीन लर्निंग (Machine Learning) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स- आय ओ टी (internet of things- IOT) या तीन गोष्टी प्रामुख्याने इंडस्ट्री 4.0 चा गाभा आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रॉडक्शन मशीन्स (Production Machines) आणि संबंधित सगळी यंत्रणा (System) स्वतःला विकसित करून स्वतःच निर्णय घेते. एकमेकांशी गोष्टी शेअर करते. त्यामुळे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ती यंत्रणा गोष्ट स्वतःच विकसित-डेव्हलप होऊन प्रोडक्शन किंवा उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ आणि तेवढीच अचूकता निर्माण होते. स्मार्ट मशीन डेव्हलप किंवा विकसित करणे हे इंडस्ट्री 4.0 चे मुख्य उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये समन्वय (Coordination) साधून एकमेकांच्या उद्योगांना पूरक अशा गोष्टी एकमेकांशी शेअर करणे आणि त्यातून शिकत जाऊन आणखी चांगली यंत्र उभी करणे हा हे देखील इंडस्ट्री 4.0 मुळे शक्य आहे. स्मार्ट मशीन्स किंवा स्मार्ट डिव्हायसेस (Smart Machines or Smart Devices) हे इंडस्ट्री 4.0 चेच फळ आहे. विना ड्रायव्हर चालणारी कार (Driverless Car), स्मार्ट स्मार्ट फोन्स (Smart Phones) ही काही मुख्य उदाहरणे!
मित्रांनो, ही औद्योगिक प्रगती या पुढील काळात अशीच चालू राहील आणि मानवी बुद्धिमत्तेचे आणखी चमत्कार यापुढील काळातही आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की! पण या प्रगतीतही आपला निसर्ग आणि आपल्यातलं माणूसपण आपण जपणं हेही तितकच महत्त्वाचं!
इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमकं काय l What is Industry 4.0 in Marathi