अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? What is classical-Abhijaat Marathi?

अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? What is classical-Abhijaat Marathi?

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
– कविवर्य सुरेश भट

 

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत.  मित्रांनो ०३ ऑक्टोबर २०२४ हा दिवस आपल्या सर्व मराठी भाषिक बांधवांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस ठरला. कारण आपल्या माय मराठीला याच दिवशी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मान्य करण्यात आला आणि समस्त मराठी जनांना ही गोड बातमी देण्यात आले. परंतु यानंतर आपल्यासारख्या मराठी प्रेमी सामान्यांना असे अनेक प्रश्न पडले की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय किंवा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे आता काय बदल होईल किंवा याचा मराठी भाषेच्या संवर्धनावरती काही परिणाम होईल का किंवा याआधी अशा कोणत्या भाषा आहेत की ज्या अभिजात भाषा म्हणून मान्यता पावलेल्या आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.

हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? What is classical-Abhijaat Language in Marathi?

शब्दशः अभिजात या शब्दाचा अर्थ होतो की प्राचीन, वैभवशाली परंपरा असलेला! आणि अभिजात भाषा हा केंद्र सरकारकडून दिला जाणारा भाषेसाठीचा एक खास दर्जा आहे. जेव्हा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो तेव्हा ती भाषा प्राचीन इतिहास असणारी, स्वतःचे वेगळेपण जपलेली आणि त्या भाषेतल्या साहित्याने समृद्ध असलेली असावी लागते. आपल्या केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष घालून दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे

  • भाषेचा इतिहास आणि प्राचिनता: साधारणपणे भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास असायला हवा, म्हणजेच ती भाषा पुरेशी प्राचीन असायला हवी. प्राचीन काळापासूनच या भाषेमध्ये उत्तम उत्तम साहित्याची निर्मिती झालेली असावी.
  • भाषेचा स्वयंभूपणा: ही भाषा प्राचीन काळापासूनच स्वयंभू म्हणजे दुसऱ्या कोणत्याही भाषेवर थेट अवलंबलेली नसावी.
  • भाषेचा गाभा: प्राचीन भाषा आणि तिचे आत्ताचे आधुनिक रूप यांचे मूळ किंवा गाभा एकच असावा.

जी भाषा वरील सर्व निकष पूर्ण करते त्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो.

 

मराठी भाषेचा अभिजात भाषा म्हणून संघर्ष 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक पातळ्यांवरती संघर्ष करण्यात आलेला आहे.

‘माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेंही पैजा जिंके’

असा विश्वास असणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा  

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोऱ्यातील शिळा!’

असं कौतुक करणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज

या सार्‍या थोर संत आणि साहित्यिकांनी मराठी भाषेला मुळातच समृद्ध केलंय. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक मराठी भाषा प्रेमींनी आणि अभ्यासकांनी यासाठी आपला हातभार लावलाय. आपल्या विविधपक्षीय अनेक राज्य सरकारांनी आपापल्या परीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. त्यात विशेष करून प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीने साधारण पाचशे पानांचा एक अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. ज्यामध्ये त्यांनी मराठी भाषेची प्राचीनता, तिचं स्वयंभूपण, प्राचीन काळापासून मराठीत होत असलेल्या उत्तमोत्तम साहित्य कृती, प्राचीन मराठी आणि आत्ताची मराठी या भिन्न नसून एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे अशा अनेक गोष्टींचीअतिशय विस्तृतपणे आणि पुराव्यानिशी मांडणी केली होती. हल्लीच्या काळात नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखावरून हा शिलालेख साधारणपणे दोन हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं सिद्ध झालं आणि तो मराठी भाषेतीलच शिलालेख होता त्यामुळे मराठी किमान दोन हजार वर्षे जुनी आहे याचा खणखणीत पुरावा सर्वांसमोर आला. या आणि अशा अनेक गोष्टींचा आधार घेत तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या सततच्या पाठपुराव्याला दाद देत केंद्र सरकारने आपल्याला म्हणजेच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.

अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भारतीय भाषा l Classical-Abhijaat Indian Languages in Marathi

आतापर्यंत केंद्र सरकारने खालील भारतीय भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.

१. तमिळ २००४

२. संस्कृत २००५

३. तेलगू २००८

४. कन्नड २००८

५. मल्याळम २०१३

६. ओडिया २०१४ 

या भाषांसोबतच आता 

७. मराठी २०२४

८. पाली २०२४

९. बंगाली २०२४

१०. आसामी २०२४

११. प्राकृत २०२४

या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

 

मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे होणारे फायदे l Benefits of Marathi as a classical language in Marathi
  • मराठी भाषेतील मराठीच्या बोलीभाषांचा अभ्यास, त्यासाठीचे संशोधन आणि साहित्य संग्रह यासाठी शासनाचे अनुदान मिळतं.
  • भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय केली जाते.
  • प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्यासाठी शासनाचं सहाय्य मिळतं.
  • महाराष्ट्रातील ग्रंथालयांना मदत करून त्यांना सशक्त केलं जाईल.
  • एकंदरीतच मराठीच्या संवर्धनासाठी प्रगतीसाठी काम करणाऱ्या संस्था संघटना यांना भरीव आर्थिक मदत होईल.
  • या सर्व प्रत्यक्ष फायद्यांसोबतच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजेच भाषेशी संबंधित संशोधन आणि इतर गोष्टींसाठी जसे की माहिती संवर्धन, माहिती गोळा करणे, साहित्याचे डिजिटलायझेशन करणे यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता लागते म्हणजेच त्यासाठी अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी उपलब्ध होते. 

 

आपली जबाबदारी

मित्रांनो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालाय पण आता एक भाषाप्रेमी म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेय. जगाची भाषा म्हणून इंग्लिश नक्कीच शिका पण शक्य तिथे मराठीचा आग्रह धरा.

  • शुभेच्छा संदेश देताना मराठी वापरा.
  • सोशल मीडिया वापरताना हटकून मराठी वापरा.
  • मराठीतील उत्तमोत्तम साहित्य वाचा, इतरांना वाचायला लावा.
  • भेटवस्तु म्हणून पुस्तक द्या.
  • उत्तम मराठी नाटके, चित्रपट पहा.
  • नव्यासोबतच जुनेदेखिल चांगले मराठी संगीत ऐका.
  • मोठे फलक (बोर्ड्स, फ्लेक्स), नावांच्या पाट्या, आमंत्रण पत्रिका, लग्न किंवा वाढदिवस अशा समारंभातील नावे या सर्वांसाठी मराठीचा आग्रह धरा.

या आणि अशा अनेक गोष्टी अंगिकारूया आणि आपली माय मराठी आणखी समृद्ध करूया मग आपसूकच कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आपल्या हृदयातून ओठांवरती येतील-

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी I

हेही वाचा: मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? What is classical-Abhijaat Marathi?

 

Leave a comment