ऊर्जा बचत ऊर्जा संवर्धन माहिती l Conservation of Energy information in Marathi

ऊर्जा बचत ऊर्जा संवर्धन माहिती l Conservation of Energy information in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो विसाव्या शतकात प्रचंड मोठी औद्योगिक क्रांती घडली, त्यानंतरची एकविसाव्या शतकातील इंटरनेट क्रांती आणि आत्ताची व्हर्च्युअल रियालिटी किंवा AI या क्षेत्रामधली प्रगती आपण बघतोय. या सर्वच गोष्टींसाठी जी सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे ऊर्जा. गेल्या काही दशकांमधील ऊर्जेचा वाढलेला अनिर्बंध वापर आणि त्याचे मर्यादित उत्पादन याचा मेळ घालणे कठीण झालंय आणि त्यामुळेच गेले काही वर्ष सातत्याने ऊर्जा बचत किंवा ऊर्जेचे संवर्धन या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी आपण वाचतो ऐकतो आहोत. या लेखात आपण याच ऊर्जेच्या बचती आणि संवर्धना संदर्भात माहिती घेणार आहोत.

हेही वाचा: व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

ऊर्जा म्हणजे काय काय? What is Energy in Marathi.

एखादं काम करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा! Energy is capacity to do the work. 

अगदी सोपं उदाहरण देतो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आंघोळ, जेवण, बाहेरची कामे , चालणं-धावणं अशी अनेक कामे आपण करतो.  ही कामे करण्याची शक्ती आपल्याला कुठून मिळते, तर आपण जे अन्न खातो त्यापासून मिळते म्हणजेच अन्नापासून किंवा जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपण पाळीव प्राणी बघितले जसे की गाय, बैल, शेळी, मेंढी हे सगळे गवत किंवा पालापाचोळा खातात आणि त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. वाघ, सिंहा सारखे जंगली प्राणी शिकार करून जगतात म्हणजेच शिकार करून खाल्लेला प्राणी त्यांना ऊर्जा मिळवून देतो. म्हणजे त्यांना जे काम करायचं आहे त्याची क्षमता या खाण्यातून मिळते म्हणून हे खाणं ही त्यांची ऊर्जा!

तसंच आपण जर गाड्या बघितल्या तर त्यांचा ऊर्जेचा स्त्रोत काय असतो? आधी पेट्रोल, डिझेल, मग सीएनजी गॅस आणि आता तर वीज किंवा इलेक्ट्रिक गाड्या आपण बघतो, तर हे त्यांच्यासाठी उर्जेचे स्त्रोत झाले. पूर्वीच्या काळी रेल्वे कोळशावर चालायच्या नंतर डिझेल आणि आता विजेवर चालायला लागल्यात, ही त्यांच्यासाठी ऊर्जा झाली. आपण घरातली उपकरणे बघितली तर जास्तीत जास्त उपकरणे विजेवर चालतात. उजेडासाठी लाईट्स, पंखा, फ्रिज, मिक्सर, पंप, इस्त्री ही आणि अशी अनेक उपकरणे वीजेचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करतात.  आता मुख्य प्रश्न असा की ही ऊर्जा तयार तरी कुठे होते किंवा मुळात ऊर्जा आपल्याला तयार करता येते का? तर त्याचं उत्तर ऊर्जा अक्षय्यतेचा नियम देतो. काय सांगतो हा नियम?

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम l Law conservation of Energy.

हा नियम सांगतो की ऊर्जा कधीही तयार करता येऊ शकत नाही किंवा ती नष्टही करता येऊ शकत नाही फक्त ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलता येते आणि विश्वाची एकूण ऊर्जा सदैव कायम राहते.

म्हणजेच काय तर आपल्याला नवीन ऊर्जा तयार करता येत नाही. उदाहरणार्थ जलविद्युत प्रकल्पांमध्ये धरणाच्या पाण्यामध्ये असलेली स्थितीज ऊर्जा वीज या ऊर्जेत आपण रूपांतरित करतो आणि ही वीज जेव्हा घरात येते तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. जेव्हा आपण घरात लाईट ऑन करतो तेव्हा विजेच्या रूपातील ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बदलली जाते किंवा जेव्हा आपण इस्त्री करतो तेव्हा वीज उष्णतेत बदलते. जेव्हा एखादा फटाका पेटतो तेव्हा त्यात असलेली रासायनिक ऊर्जा प्रकाश, उष्णता, आवाज अशा ऊर्जा प्रकारांमध्ये रूपांतरीत होते. यावरूनच आपल्या असे लक्षात येते की ऊर्जा फक्त आपले रूप बदलत असते.

सध्या आपण मुख्यतः वीज ऊर्जा म्हणून वापरतो. आता वीज देखील आपण तयार करतो का? तर नाही. विद्युत प्रकल्पांमध्ये (Power Plant पॉवर प्लांटमध्ये) वीज निर्मिती होते.

पॉवर प्लांट (Power Plant) म्हणजे नेमकं काय?

जिथे वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा साधने वापरून ती ऊर्जा विजेत रूपांतरित केली जाते त्या ठिकाणाला पॉवर प्लांट असे म्हणतात.

  • जलविद्युत निर्मिती (Hydropower) : धरणांमध्ये पाणीसाठा केल्यानंतर ते पाणी उंचावरून पाईप मधून वाहून नेले जाते आणि टरबाइन मध्ये सोडले जाते ज्यामुळे टर्बाईनची पाती वेगाने फिरतात की जी जनरेटरला जोडलेली असतात आणि तिथे वीज निर्मिती होते.
  • कोळशावर आधारित विद्युत निर्मिती (Coal Power) : कोळशावर आधारित पावर प्लांट मध्ये कोळसा पेटवून पाण्याची वाफ केली जाते आणि या वाफेच्या सहाय्याने टर्बाईनची पाती वेगाने फिरतात आणि तिथे वीज निर्मिती होते.
  • अणु ऊर्जा (Atomic Energy): या प्रकल्पांमध्ये अणुऊर्जा वापरून टर्बाईनचीपाती फिरवली जातात आणि वीज निर्मिती केली जाते
  • पवन उर्जा (Wind Energy): वाहणाऱ्या हवेची म्हणजेच वाऱ्यामध्ये असलेली ऊर्जा वापरून यामध्ये पवनचक्की च्या सहाय्याने विज निर्मिती केली जाते.
  • सौर ऊर्जा (Solar Energy): ऊर्जेचा मूळ स्त्रोत असलेल्या सूर्याच्या उर्जेचा वापर करून सोलार पॅनलच्या सहाय्याने या विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते.

हेही वाचा: मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi

पारंपारिक आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत (conventional and non-conventional Energy sources)

विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या स्त्रोतांचा वापर केला जातो ते स्त्रोत संपणारे आहेत की न संपणारे आहेत याचा विचार करून पारंपारिक आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे वर्गीकरण केले जाते.

  • पारंपारिक ऊर्जा स्त्रोत: ज्या स्त्रोतांचे मर्यादित साठे पृथ्वीवरती उपलब्ध आहेत अशा स्त्रोतांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ कोळसा किंवा पेट्रोल-डिझेल याचे मर्यादित साठे पृथ्वीवरती आहेत आणि याची पुन्हा निर्मिती होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे यांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात.
  • अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत: ज्या स्त्रोतांचे अमर्याद साठे किंवा न संपणारे साठे उपलब्ध आहेत अशा स्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा कारण पाणी, सूर्य, वारा हे न संपणारे ऊर्जा स्त्रोत आहेत.
conservation-of-energy-information-in-marathi
ऊर्जा बचत ऊर्जा संवर्धन (Save Energy Conserve Energy) 

मित्रांनो आपण बघितलं की सध्या सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे आणि ऊर्जा निर्मितीला बंधने आहेत. मुळात जे पारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्यांचे साठे मर्यादित आहेत तर जे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्यांचे साठे मुबलक आहेत परंतु अजूनही त्यापासून ऊर्जा निर्मिती तेवढीशी सुलभ आणि स्वस्त झालेली नाही त्यामुळे आहे ती ऊर्जा जपून वापरणे, ती वाचवणे आणि तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शासनामार्फत किंवा मोठमोठ्या कंपन्यांमार्फत किंवा सामाजिक संस्थांमार्फत ऊर्जा बचत किंवा ऊर्जा संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जातात पण हे प्रयत्न एका मोठ्या पातळीवरती असतात परंतु त्यासोबतच जर आपण आपल्याला जमतील अशा साध्या सोपी गोष्टी करूनही ऊर्जेची बचत करू शकतो. असाच काही गोष्टी खालील प्रमाणे.

 

ऊर्जा बचतीचे सोपे मार्ग (Ways to save energy in Marathi)
  • विद्युत उपकरणांचा नियंत्रित वापर: जेव्हा गरज असेल तेव्हाच लाईट, फॅन, टीव्ही किंवा इतर विद्युत उपकरणे वापरा. आपल्याला गरज नसताना आठवणीने ते बंद करा. म्हणजे आपण खोलीत बसून अभ्यास करत असू आणि आपण अभ्यास झाल्यानंतर खोलीतून बाहेर पडत असू तर आठवणीने लाईट आणि फॅन बंद करा. काहीजण या गोष्टी आपल्या घरी आवर्जून करतात परंतु सार्वजनिक ठिकाणी जसे की शाळा, कॉलेज, सभागृह अशा ठिकाणी या गोष्टी सोयीस्करपणे विसरल्या जातात. तर तुम्ही सर्वत्रच ही गोष्ट अंमलात आणायला सुरुवात करा.
  • फ्रीजचा मर्यादित वापर: लहान मुलांना सतत फ्रीज उघडायची सवय असते. फ्रीजमध्ये काही असो वा नसो दर अर्ध्या तासाने किंवा पंधरा मिनिटांनी फ्रीज उघडायचा आणि आत मध्ये डोकावायचे असे सतत चालू असते ही सवय बंद करा. यामुळे देखील विजेची बचत व्हायला मदत होते.
  • पाणीबचत: आता पाणी बचत आणि ऊर्जा बचत यांचा संबंध काय? तर आपल्याला उपलब्ध होणारे स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्प्यांवर ऊर्जेचा वापर झालेला असतो. जसे की पंप, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा त्यामुळे असे पाणी वाया न घालवता व्यवस्थित वापरणे याने देखील उर्जेची बचतच होते.
  • ताटातील जेवण पूर्णपणे संपवणे: आपल्या ताटात असलेले तऱ्हेतऱ्हेचे अन्नपदार्थ तयार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर झालेला असतो, मग ती मानवी ऊर्जा असेल किंवा यांत्रिक ऊर्जा असेल. जेव्हा आपण अन्नपदार्थ वाया घालवतो तेव्हा अप्रत्यक्षपणे ही ऊर्जा देखील आपण वाया घालवतो त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढेच अन्नपदार्थ ताटात वाढून घेणे आणि ते पूर्णपणे संपवणे ही गोष्ट ऊर्जा बचतीला हातभार लावते.
  • खेळणी आणि इतर वस्तूंचा जबाबदारी पूर्वक वापर: हल्लीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर खेळणी मुलांना दिली जातात किंवा सतत नवीन शालेय साहित्य मुलांना दिलं जातं जसे की दप्तर, कंपास. परंतु मुलं याचा बेजबाबदार वापर करतात आणि सतत या गोष्टी खरेदी करून त्या पुनःपुन्हा मुलांना दिल्या जातात. या वस्तू बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर उर्जेचा वापर होतो आणि जबाबदारी पूर्वक मुलांनी त्या वस्तू दीर्घ काळासाठी वापरल्या तर ऊर्जेची बचत होईलच, तुमच्या पैशांचीदेखिल बचत होईल आणि मुख्य म्हणजे मुलांना देखील जबाबदारीने वागण्याची सवय लागेल.

मित्रांनो हे आणि असे अनेक उपाय करून आपण ऊर्जेची बचत करू शकतो. जिथे शक्य होईल तिथे ऊर्जेचा वापर आपण टाळू शकतो. आता या सर्वांमध्ये असलेली मोठी अडचण म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची बचत करायला सांगतो तेव्हा बऱ्याच जणांचा असा सूर असतो की माझ्याकडे पैसे आहेत, मी कितीही वीज बिल भरू शकतो, मी कितीही वस्तू विकत घेऊ शकतो, तर मी त्याची बचत का करायची? याचं उत्तर असं की आपल्या देशात आणि जगातही अनेक ठिकाणी अनेकांच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. असं असताना आपण या गोष्टींचा केवळ मी सधन आहे म्हणून अपव्यय करणे योग्य आहे का, याचा विचार करा आणि तुम्ही सधन असालच तर अशा गोष्टी गरजवंतांना देऊन सत्कर्म करायला काय हरकत आहे? विचार करा आणि ठरावा. धन्यवाद!

ऊर्जा बचत ऊर्जा संवर्धन माहिती l Conservation of Energy information in Marathi

Leave a comment