पॉन्झी स्कीम म्हणजे नक्की काय? आपला बचाव कसा करायचा? What is Ponzi scheme? How to protect yourself? in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, वर्तमानपत्रात, टेलिव्हिजनवरती किंवा सोशल मीडिया वरती एखाद्या आर्थिक घोटाळ्याची माहिती उघड झाली तर बऱ्याचदा आपण आपसात चर्चा करताना ती पॉन्झी स्कीम होती असं म्हणतो. आता पॉन्झी स्कीम म्हणजे नेमकं काय किंवा पॉन्झी हे नाव कुठून आलं हे या लेखात आपण पाहणार आहोत. आणि अशा घोटाळ्यांपासून म्हणजेच पॉन्झी स्कीम पासून आपण कसे सुरक्षित रहावे यावर देखील आपण चर्चा करणार आहोत.
पॉन्झी स्कीम म्हणजे काय?
मित्रांनो आपल्या रोजच्या जगण्यात पैसा किती महत्त्वाचा आहे हे आपण सारे जाणतो. तो मिळवण्याचे विविध मार्ग शोधतो. नोकरी असेल, उद्योग असेल किंवा कृषीवर आधारित शेतीतून मिळणारे उत्पन्न असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण अर्थार्जन करतो आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यातूनच काही पैसे बाजूला काढून किंवा बचत करून आपण ते विविध योजनांमध्ये गुंतवतो. पैशाने पैसा वाढतो या तत्त्वावर पैशांच्या गुंतवणुकीतून आणखी पैसे मिळतात. अर्थात यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अगदी एफ डी (FD) असेल, आर डी(RD) असेल, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, जमीन खरेदी, सोने खरेदी असे अनेक गुंतवणुकीचे प्रकार आपल्याकडे आहेत. सध्याच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून तर्हेतर्हेची माहिती आपल्या समोर येत असते आणि अशा अनेक योजना आपल्या कानावर पडत असतात. आता शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड या आधुनिक काळातील गुंतवणुकीच्या योजना असल्या तरी सोने खरेदी किंवा जमीन खरेदी या प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुंतवणुकीच्या योजना आहेत. परंतु या सर्व गुंतवणुकीवर मिळणारा परतावा (return) हा साधारणपणे वार्षिक ३% टक्के ते जास्तीत जास्त २०% च्या मर्यादेपर्यंत असतो. आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळाला पाहिजे ही मानवी वृत्ती आहे आणि यातूनच जर कोणी महिन्याला दहा टक्के परतावा, एका वर्षात दुप्पट पैसे अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना आणल्या तर त्यात अनेक लोक सहभागी होतात आणि कालांतराने या अवास्तव योजनांचा फुगा फुटतो आणि अनेक लोकांचा पैसा यामध्ये बुडतो. अशा फसव्या योजनांनाच किंवा घोटाळ्यांना पॉन्झी स्कीम असे म्हणतात.
नवीन गुंतवणूकदारांचे पैसे वापरून तेच आधीच्या गुंतवणूकदारांना परताव्यासहित परत करणे म्हणजेच पॉन्झी स्कीम.
हेही वाचा: आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
पॉन्झी स्कीमचे वर्किंग मॉडेल
मित्रांनो आर्थिक घोटाळ्यांसाठी वापरला जाणारा पॉन्झी स्कीम मधला पॉन्झी हा एखादा इंग्लिश शब्द नसून हे एक आडनाव आहे. साधारणपणे १०० वर्षांपूर्वी अमेरिकेत चार्ल्स पॉन्झी नावाचा एक माणूस होऊन गेला ज्याने एक फार मोठा आर्थिक घोटाळा केला आणि अनेक लोकांचे तसेच बँकांचे पैसे बुडवले तेव्हापासून आर्थिक फसव्या योजना किंवा घोटाळ्यांना पॉन्झी स्कीम हे नाव पडले. आता पॉझी स्कीम नेमक्या असतात तरी कशा? अशा योजनांमध्ये मोठ मोठ्या परताव्यांची आमिषे दाखवली जातात जसे की महिन्याला दहा टक्के रिटर्न, एका वर्षात दुप्पट पैसे किंवा अगदी दोन वर्षात तिप्पट पैसे इ. अशा तर्हेची प्रलोभने बघून लोभी मनुष्य या सगळ्याला फसतो आणि अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतो. नेहमीच अशा योजना आणणारी लोकं सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा देतात आणि लोकांचा विश्वास संपादन करायला लागतात आणि त्यावरूनच अनेक लोक मोठमोठ्या गुंतवणुका करायला सुरुवात करतात. या योजनांच वर्किंग मॉडेलच असं आहे की जसे जसे नवीन गुंतवणूकदार येतात तसे तसे त्यांचे पैसे वापरून ते आधीच्या गुंतवणूकदारांचा परताव्या सहित मुद्दल परत करतात. यातूनच त्यांच्यावरचा विश्वास वाढायला लागतो आणि अधिकाधिक मोठ्या गुंतवणुका व्हायला सुरुवात होते. एखाद्या न चालणाऱ्या उद्योगाच्या नावाने ही गुंतवणूक घेतली जाते आणि तो उद्योग भरभराटीला येतोय, मोठा होतोय असं भासवून त्यावरच हा परतावा दिला जातोय असं एक फसवं चित्र उभं केलं जातं. अर्थातच असा कुठलाही उद्योग प्रत्यक्षात नसतो त्यामुळे जेव्हा नवीन गुंतवणूक कमी व्हायला लागते तेव्हा आधीच्या गुंतवणूकदारांना मुद्दल आणि परतावा देताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी याचे संस्थापक हाताशी असलेला सगळा पैसा घेऊन पलायन करतात. त्यामुळे जेव्हा हा घोटाळा उघडकीस येतो तेव्हा गुंतवणूकदारांवर आभाळ कोसळतं. आणि असे अनेक उद्योग चार्ल्स पॉन्झीने केल्यामुळे त्याचं नाव अशा योजनांना कायमचच चिकटलंय.
हेही वाचा: आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi
पॉन्झी स्कीम पासून आपला बचाव कसा करायचा? How to protect yourself from Ponzi scheme?
पॉन्झी स्कीम किंवा अशा फसव्या योजनांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील पाच मुद्दे लक्षात घ्या.
- कुठल्याही अधिकृत बँकेकडून किंवा कायदेशीर संस्थांकडून मिळणारा परतावा हा साधारणपणे वार्षिक ३% ते १५% च्या आसपास असतो. अगदी जास्तीत जास्त म्हणजे हा आकडा २०% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच साधारणपणे ४ ते १५ वर्ष पैसे दुप्पट होण्यासाठी लागतात. त्यामुळे जेव्हा कोणी यापेक्षा जास्त परताव्याचं किंवा एक वर्षात दुप्पट पैसे, दोन वर्षात तिप्पट पैसे असं अमिष आपल्याला दाखवतो तेव्हा अर्थातच ते खोटं आहे याची नोंद घ्या. आणि त्यापासून लांब रहा.
- गुंतवणुकीशी संबंधित सर्व संस्था या शासनाकडे रजिस्टर असतात. जसं की शेअर मार्केटचं नियमन सेबी करते. त्या संबंधित त्या संस्थेची सर्व कागदपत्रे किंवा परवाने काळजीपूर्वक तपासा.
- परताव्याची शंभर टक्के हमी अशी खात्री जिथे दिलेली असते तिथे तुम्हाला संशय यायला हवा, कारण म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट यामध्ये आपल्याला जास्त परतावा मिळतो (हाही एका वर्षात १००% शक्य नाही) परंतु जोखीम तेवढी जास्त असते कुठल्याही जोखीमेशिवाय जर का एका वर्षात पैसे दुप्पट होणार असतील तर ते अद्याप कुठल्याही गुंतवणुकीला शक्य झालेले नाही.
- कुठलीही पार्श्वभूमी नसताना अचानकपणे एखाद्या संस्थेचे नाव प्रकाशझोतात येणे, भरभक्कम परताव्याचे आश्वासन देणे या गोष्टी दिसल्या तर सावध पावले टाका.
- शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सांगतात म्हणून कुठल्याही योजनेत पैसे गुंतवू नका. स्वतः खात्री करा आणि मगच निर्णय घ्या.
आपल्या बचतीतून आपण करत असलेली गुंतवणूक ही आपल्या कष्टाच्या कमाईतूनच होत असते. म्हणून कोणतीही गुंतवणूक करताना चार वेळा खात्री केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका.
पॉन्झी स्कीम म्हणजे नक्की काय? आपला बचाव कसा करायचा? What is Ponzi scheme? How to protect yourself? in Marathi