आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
पैसा
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या आयुष्यात कितीही नाही म्हटलं तरी पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाही तसंच पैशाशिवाय काहीच करता येत नाही हे देखील तेवढेच खरं आहे. प्रत्येक जण पैसे मिळवण्यासाठी काही ना काही पर्याय शोधत असतो. म्हणजे नोकरी करणं असेल, शेती करून त्यातून उत्पन्न मिळवणं असेल, एखादा व्यावसाय असेल किंवा एखादा मोठा बिझनेस उभा करणं असेल या सगळ्याचा अंतिम हेतू हा पैसे मिळवणं हाच असतो. सध्या सर्वच लोक पैशासाठी म्हणजेच पर्यायाने पोटासाठी धावत असतात परंतु हे पैसे आपल्याला व्यवस्थित पुरतात का? जे आपण मिळवतो त्यामध्ये आपल्या सर्व गरजा भागतात का? काही आपत्कालीन परिस्थिती आली जसं की अपघात किंवा अचानक उद्भवणारं आजारपण, काही मोठी नवीन गोष्ट करायची असेल जसे की कार, घर किंवा लग्न तर त्यासाठी आपल्याकडे काही रक्कम शिल्लक राहते आहे का? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला सतत भेडसावतात आणि या सर्व प्रश्नांचे मूळ असतं पैसा! आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi हा याच प्रश्नाचे एक उत्तर आहे.
हेही वाचा: शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi
मित्रांनो या वरती उल्लेख केलेल्या सगळ्याच गोष्टी साध्य करायच्या असतील तर त्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे जास्तीचा पैसा मिळवणं किंवा खर्च कमी करणं. पण बऱ्याचदा पैसा मिळवण्याचे मार्ग मर्यादित असतात आणि त्याला लगेचच पर्याय शोधणे शक्य नसते परंतु खर्चाचं काय? खर्च करणं तर आपल्या हातात असतं. आता कोणी म्हणेल जीवनावश्यक वस्तूंसाठी तर पैसे खर्च करावे लागणारच त्यात हात आखडता घेऊन कसं चालेल. मित्रांनो खर्च तर करावा लागणारच पण त्याचंच जर आपण योग्य नियोजन केलं तर आपण नक्कीच या सर्वच गोष्टींसाठी पैसे उभे करू शकतो किंवा त्याची बचत करून, योग्य गुंतवणूक करून त्यात वाढ करू शकतो. यासाठीच खर्चाचं नियोजन ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आवश्यक असणारी अर्थसाक्षरता अजूनही आपल्याकडे म्हणावी तेवढी नाही. म्हणजे पैसा मिळवणं आपण जाणतो, त्याचा खर्च करणे देखील आपण जाणतो पण त्या खर्चाचं नियोजन अजूनही कित्येक घरांमध्ये केलं जात नाही आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. याच नियोजनासाठी जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यातलाच एक सोपा आणि सुटसुटीत पर्याय म्हणजेच आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम
आता हा नियम नक्की काय आहे हे आपण पाहूया. पैशाच्या नियोजनाचा एक हा एक अतिशय लोकप्रिय आणि वेगवेगळ्या निकषांवरती तपासून बघितलेला अतिशय उत्तम पर्याय आहे. आपण जे पैसे मिळवतो ते मुख्यत्वे करून जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी, काही पैसे आपल्या आवडी-निवडी, हौसे-मौजेसाठी तर काही पैसे हे कार, घर किंवा लग्न अशा मोठ्या गोष्टींसाठी लागणारे मोठे खर्च करण्यासाठी असतात. ५०-३०-२० या नियमानुसार आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात ची विभागणी वेगवेगळ्या गटात केली जाते आणि त्यानुसार खर्चाचे नियोजन केले जाते. या नियमानुसार उत्पन्नाची विभागणी ५०%, ३०% आणि २०% अशा खालील तीन प्रमुख गटात केली जाते.
पहिला गट ५०% हिस्सा: आपल्या महिन्याच्या उत्पन्नाचा ५० टक्के हिस्सा हा आपल्या जीवनावश्यक गरजांसाठी करावा लागणारा खर्च म्हणून बाजूला काढा. उदाहरणार्थ घरातील जिन्नस, नेहमीच्या घरगुती गरजा, वेगवेगळी बिले जसं की पाण्याचे बिल, लाईट बिल, गाडीचे पेट्रोल इत्यादी.
दुसरा गट ३०% हिस्सा: आपल्या महिन्याच्या उत्पन्नाचा ३० टक्के हिस्सा हा आपल्या आवडी:, छंद यावरच्या खर्चासाठी बाजूला काढा. हा म्हणजे असा खर्च की जो तुम्हाला गरजेचा नाही मात्र तो केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो जसं की फिल्म किंवा नाटक पहाणे, ट्रीपला जाणे, दागिन्यांवरचा खर्च इत्यादी.
तिसरा गट २०% हिस्सा: हा सर्वात छोटा आणि तरी देखील सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहे. तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या २० टक्के हिस्सा हा बचतीचा म्हणजेच आर्थिक गुंतवणुकीचा आहे. जो तुमच्या भविष्यातील वेगवेगळ्या गरजांसाठी राखून ठेवला जातो. यामध्ये मोठ्या गोष्टी जसे की घर, लग्न किंवा निवृत्तीनंतरच्या योजना किंवा गरजा यांचा समावेश होतो. यासाठी फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट असे नानाविधी पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या ज्ञानानुसार किंवा तज्ञ लोकांच्या सल्ल्याने आपण यातले वेगवेगळे प्रकार गुंतवणुकीसाठी वापरू शकतो.
आपले आर्थिक उत्पन्न किंवा पगार काहीही असला तरी वरील प्रमाणे जर आपण आपले महिन्याचे मासिक आर्थिक उत्पन्न जर जीवनावश्यक गरजांसाठी ५० टक्के, आपल्या आवडीसाठी ३० टक्के आणि बचतीसाठी २० टक्के अशा प्रकारे विभागले आणि काटेकोर आर्थिक शिस्त पाळत याप्रमाणे सातत्याने आर्थिक नियोजन केले तर लवकरच आपण पैशासंबंधीच्या सर्व प्रश्नांमधून मुक्त होऊ शकतो. आणि अर्थातच आर्थिक तणाव किंवा चिंता यापासून मुक्त होऊन आपण आपले आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो.
५०-३०-२० चे उदाहरण
मित्रांनो खालील उदाहरणाच्या सहाय्याने हा ५०-३०-२० नियम नक्की काय आहे ते आपण समजावून घेऊया.
असं समजा की प्रत्येक महिन्याला तुम्ही ४० हजार रुपये कमावता अशा वेळी ५०-३०-२० या नियमानुसार त्यातले ५०% म्हणजेच २० हजार रुपये तुम्ही तुमच्या जीवनावश्य खर्चासाठी वापरले पाहिजेत. त्यासोबतच दुसरा हिस्सा म्हणजे ३०% म्हणजेच १२ हजार रुपये तुमच्या आवडीनिवडींसाठी तुम्ही वापरले पाहिजेत आणि राहिलेले २०% म्हणजेच ८ हजार रुपये हे बचतीसाठी म्हणजेच वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वापरले पाहिजेत. मित्रांनो हे २० टक्के म्हणजेच आठ हजार रुपये जरी कमी वाटत असले तरी अतिशय नियमितपणे तुम्ही ते गुंतवणुकीसाठी वापलेत तर जास्त कालावधीनंतर कंपाऊंडिंग इंटरेस्ट चा फायदा मिळून आपल्याकडे एक चांगली रक्कम जमा होते की जी मोठ्या आर्थिक प्रश्नांसाठी जसं की कार, घर, लग्न वापरू शकता. किंवा मोठी आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर दुसऱ्या कोणावरही विसंबून न राहता याच रकमेचा आपल्याला मोठा फायदा होतो.
जीवन विमा आणि आरोग्य विमा
यासोबतच जीवन विमा आणि आरोग्य विमा यासारख्या गोष्टी आपण योग्य वेळी सुरू केल्या तर आणीबाणीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा मिळतो आणि आपली संपत्ती किंवा आपण बचतीतून गुंतवणुकीतून जमा केलेली रक्कम अशावेळी खर्च न होता आपल्या ठरवलेल्या भविष्यातील योजनांसाठी टिकून राहते. तर मित्रांनो आता वाट न बघता या क्षणापासूनच ५०-३०-२० या आर्थिक नियमानुसार आपल्या खर्चाचं योग्य नियोजन सुरू करा. शक्य असेल तर उत्पन्नाचे मार्ग वाढवा जिथे शक्य आहे तिथे अनावश्यक खर्चाला कात्री लावा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
हेही वाचा: आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi