पाऊस कसा मोजतात? मिमी पाऊस म्हणजे किती? How rain measures? mm rain meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो, yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो पावसाळा सुरू झाला की वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनेल वरती पावसाच्या बातम्या दिसायला लागतात मुंबईत २०० मिलिमीटर (200 mm rain in Mumbai) पाऊस पडला आणि मुंबईत पाणी भरले. कोकणात जोरदार पाऊस, २४ तासात २५० मिलिमीटर (250 mm rain in 24 hours) पावसाची नोंद. मराठवाडा अजूनही कोरडाच पाऊस केवळ १० मिलिमीटर (10 mm rain)! अशा पाऊस दाखवणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या आणि पावसाचे प्रमाण दाखवणारे वेगवेगळे आकडे दिसायला लागतात. पण पाऊस मोजतात तरी कसा? आणि तो मिलिमीटर मध्ये का मोजतात? याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
हेही वाचा: मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi
पावसाचे प्रमाण मोजण्याचा मूलभूत सिद्धांत
पाऊस म्हणजे पाणी जे द्रव आहे आणि द्रवाचे मोजमाप आपण लिटर मध्ये करतो किंवा मिली लिटर मध्ये करतो जसे की एक लिटर दूध, शंभर लिटर पाणी, पाच मिलिलीटर औषध आणि आपण पाऊस मोजतो मिलिमीटर मध्ये. खरं तर मिलिमीटर हे लांबी मोजण्याचे एकक आहे मग हे गौडबंगाल नक्की काय आहे असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. त्यासाठी पाऊस मोजण्याचे मूलभूत तत्व आपण समजून घेतले पाहिजे.
एका विशिष्ट वेळेत पडलेल्या पावसामुळे जमिनीवर साठलेल्या पाण्याची उंची म्हणजेच झालेला पाऊस. आणि ही उंची ज्या एककात मोजतात तेवढा पाऊस. उदाहरणार्थ ५० मिलिमीटर पाऊस! यात पावसाचे पाणी वाहून न जाता सर्वच्या सर्व पाणी एकत्र साठले आहे असे गृहीत धरले जाते. म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रात बातमी असते की मुंबईत २५० मिलिमीटर पाऊस याचा सरळ अर्थ असा की जर का ते पाणी कुठेही वाहून गेले नसते तर २५० मिलिमीटर (२५ सेंटिमीटर) उंची एवढं पाणी मुंबईत सर्वत्र साठलं असतं. म्हणूनच आपण पावसामुळे पडलेल्या आणि साठलेल्या पाण्याची उंची मोजतो आणि पाऊस म्हणून त्या उंचीची नोंद करतो. यात उंची मोजण्यासाठी वापरली जाणारी इतरही एकके वापरली जातात जसे की इंच, फूट किंवा मीटर.
हेही वाचा: एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi.
पाऊस मोजणारे उपकरण (रेन गेज – Rain Gauge)
पाऊस मोजणाऱ्या यंत्राला किंवा उपकरणाला पर्जन्यमापक अर्थातच रेन गेज (Rain Gauge) असे म्हणतात. जेव्हा कोणालाही पाऊस मोजायचा असतो उदाहरणार्थ आपल्याकडे हवामान खाते पावसाचे मोजमाप करते यासाठी ते ज्या ठिकाणाचा पाऊस मोजायचा आहे त्या ठिकाणी पर्जन्यमापक ठेवतात. आता पर्जन्यमापक म्हणजे नेमकं काय तर शक्यतो दंडगोलाकृती आकाराचं एखादं भांड जमिनीवरती किंवा अशा ठिकाणी ठेवले जाते की जिथे वरून पडणाऱ्या पावसाला कोणताही अडथळा येणार नाही, आकाशातून पडणारा पाऊस थेट त्या भांड्यात जमा होईल. पावसाचे पाणी व्यवस्थित जमा होण्यासाठी त्या भांड्याच्या वरती तेवढ्याच आकाराचे नरसाळे किंवा फनेल (funnel) ठेवले जाते. या भांड्याच्या बाहेरच्या बाजूने मिलिमीटर मध्ये उंचीची नोंद केलेली असते. जेव्हा तुम्हाला पाऊस मोजायचा असेल तेव्हा साठलेल्या पाण्याच्या उंचीची नोंद केली की हा झाला तेवढ्या वेळात मिलिमीटर मध्ये पडलेला पाऊस. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती की त्या भांड्याचा व्यास किंवा आकार कोणताही चालेल मात्र तो आकार वरपासून खालपर्यंत एक समान असला पाहिजे. जर का भांड्याचे तोंड मोठे असेल आणि त्याचा तळ छोटा असेल किंवा उलट असेल तर मोजमाप चुकू शकते किंवा त्यासाठी थोडी आकडेमोड करून उत्तर काढावे लागते.
घरच्या घरी पर्जन्यमापक किंवा रेन गेज (Rain Guage)
आपल्याला वर्तमानपत्र किंवा टीव्ही वरती दिसणाऱ्या बातम्यांमधून आपल्या भागातला पाऊस कळतो परंतु आपल्या घराजवळ किंवा आपल्या गावात किती पाऊस झाला हे आपल्याला शोधायचे असेल किंवा माहित करायचे असेल तर आपण आपल्या घराजवळ पर्जन्यमापक बसवून ते अगदी सहजपणे साध्य करू शकतो. पर्जन्यमापक बनवण्यासाठी तुम्हाला ज्याचा आकार वर पासून खालपर्यंत एक समान आहे असे कोणतेही गोलाकार भांडे चालेल जसे की एखादी कापलेली काचेची किंवा प्लास्टिकची बाटली. त्या बाटलीवर तेवढ्याच आकाराचे नरसाळे ठेवा जेणेकरून पाणी जमा होणे सोपे जाईल. त्या बाटलीवर बाहेरच्या बाजूने तळापासून शून्याने सुरुवात करून मोजपट्टी च्या साहाय्याने मिलिमीटर मध्ये आकडे नोंदवायचे. हे करताना पावसात न पुसली जाणारी शाई किंवा पर्मनंट मार्कर वापरा. पर्जन्यमापक तयार झाला. आता जमिनीवरती किंवा अशा ठिकाणी तो ठेवा की जिथे वरून पडणाऱ्या पावसाला कोणताही अडथळा येणार नाही, आकाशातून पडणारा पाऊस थेट त्या भांड्यात जमा होईल. आता दिवसाची एक वेळ ठरवा जसे की सकाळी ९. आणि रोज त्या वेळेत साठलेल्या पाण्याच्या उंचीची म्हणजेच मिलिमीटर मधल्या पावसाची नोंद करा. नोंद झाली की साठलेले पाणी ओतून टाका. जास्त पाऊस पडून भांडे भरत असेल तेव्हा दिवसातून दोनदा नोंद घेता येईल. जेव्हा आपण अशा सगळ्या महिन्याच्या किंवा वर्षाच्या नोंदींची बेरीज करू तेव्हा आपल्याला त्या महिन्यातील किंवा वर्षातील पाऊस कळू शकतो. आणि साहजिकच ह आकडा जास्त असल्याने मिलिमीटर ऐवजी सेंटीमिटर वापरले जाते. उदा. महाबळेश्वरचा वार्षिक पाऊस ६००० मिमी (600 mm rain at Mahabaleshwar ) किंवा ६०० सेमी असेल तर त्याचा अर्थ असा कि जर पाणी वाहून गेले नसते तर महाबळेश्वरमध्ये ६०० सेमी चा पाण्याचा थर सर्वत्र साठला असता. जेव्हा सरासरी पाऊस सांगितला जातो तेव्हा त्या भागातील सर्व पर्जन्यमापकांच्या नोंदींची सरासरी काढली जाते.
आपण या लेखात पाऊस कसा मोजतात? How rain measures in Marathi हे बघितले तर मग येत्या पावसाळ्यात स्वतःचा पर्जन्यमापक करणार ना?
पाऊस कसा मोजतात? मिमी पाऊस म्हणजे किती? How rain measures? mm rain meaning in Marathi